कोरोनामुळे पालकांचे छत्र हरपलेल्या मुलांची माहिती कळवण्याचे राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना आदेश !

प्रतिकात्मक छायाचित्र

संभाजीनगर – मार्च २०२० नंतर कोरोनामुळे अथवा इतर कारणांमुळे पालकांचे छत्र हरपलेल्या अंशतः किंवा पूर्णतः निराधार बालकांची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून १९ ऑगस्टपर्यंत मागवण्यात आली आहे. याविषयी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना आदेश देण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने २७ जुलै या दिवशी दिलेल्या आदेशान्वये मार्च २०२० नंतर कोविड अथवा इतर कारणे यांमुळे आई, वडील अथवा दोन्हीही पालक गमावल्यामुळे अंशतः किंवा पूर्णतः निराधार झालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण खासगी अथवा शासकीय शाळांमध्ये नियमित चालू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तसेच राज्यातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या २३ ऑगस्टपूर्वी शिक्षण संचालनालयाकडे सादर करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व माध्यमे आणि व्यवस्थापन यांच्या शाळांमधील अंशतः किंवा पूर्णतः निराधार विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून सादर करावी लागणार आहे. ही माहिती कोणत्याही प्रकारे अपूर्ण आणि त्रोटक स्वरूपाची नसावी, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सर्व विभागीय उपसंचालकांना पत्राद्वारे दिल्या आहेत.