सिंधुदुर्ग – बार कौन्सिलच्या नामफलकावर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचे नाव कोरण्यात बार कौन्सिलच्या सर्व सदस्य अधिवक्त्यांचा मोठा वाटा आहे. अधिवक्त्यांच्या समस्या सोडवण्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ होण्यासाठी प्रयत्न केले जातील. सिंधुदुर्गचे नाव महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या नकाशावर अधोरेखित करण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असे प्रतिपादन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे नूतन उपाध्यक्ष अधिवक्ता संग्राम देसाई यांनी केले.
‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा’च्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याविषयी अधिवक्ता देसाई यांचा सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा बार कौन्सिलच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष राजेंद्र रावराणे, उपाध्यक्ष गिरीश गिरकर, सचिव अमोल मालवणकर, सहसचिव यतीन खानोलकर, खजिनदार प्रकाश बोडस यांच्यासह जिल्ह्यातील अधिवक्ता उपस्थित होते.
या वेळी अधिवक्ता संग्राम देसाई म्हणाले, ‘‘मी कोणते मोठे काम केले समजत नाही. कोणत्याही पदावर जावो सामान्यासारखे राहिले पाहिजे. काही प्रकरणांत काम करतांना अधिवक्त्यांमध्ये कटुता येते; परंतु अशी कटुता विसरून माझा सत्कार केला, यातच सर्वकाही आले. मला निवडून आणण्यामध्ये सर्वांनी सहकार्य केले आहे. त्याचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ होण्यासाठी लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करून प्रयत्न करू, तसेच मुंबई उच्च न्यायालयात तेथील प्रशिक्षित प्रतिष्ठित अधिवक्त्यांकडे येथील तरुण अधिवक्त्यांना पाठवून उच्च न्यायालयातही सिंधुदुर्गातील अधिवक्ते पोचतील, यासाठी प्रयत्न करणार आहे.’’