सेवेची तीव्र तळमळ आणि गुरुदेवांवर अढळ श्रद्धा असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सयाजीराव जमदाडे (वय ७० वर्षे) !

श्री. सयाजीराव जमदाडे

१. व्यष्टी साधनेविषयी गांभीर्य

‘काका व्यष्टी साधनेचे सर्व प्रयत्न आणि उपाय नियमितपणे पूर्ण करतात अन् त्याचा आढावाही नियमितपणे देतात.

२. चुकांविषयी खंत वाटणे

काकांना चूक सांगितल्यावर अथवा एखादी चूक त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांना तिची खंत वाटते. ते चुकीसाठी क्षमायाचना करतात. त्यांच्या छोट्या नातीचीही ते क्षमा मागतात. त्यांच्या बोलण्यातूनही चुकांची खंत जाणवते.

३. परिस्थिती स्वीकारणे आणि निरपेक्षता

काकांच्या दोन्ही मुलांचे विवाह झालेले आहेत. एक मुलगा परदेशी असतो आणि दुसरा गावाकडे येऊन-जाऊन करतो. अजूनही पुष्कळ वेळा काकांना खानावळीचा डबा घ्यावा लागतो; मात्र ‘मी इतकी वर्षे सोसले आहे, तर मुलांनी माझा विचार करायला हवा’, असे त्यांना वाटत नाही. ते आहे ती परिस्थिती स्वीकारतात. पुष्कळ वेळा काका सेवेसाठी बाहेरच्या गावी जातात. तेव्हा त्यांना लवकर निघावे लागते. तोपर्यंत खानावळीचा डबा येत नाही. त्या वेळी काकांनी कधीही ‘माझा डबा वेळेत येत नाही, तर माझी जेवणाची सोय करा’, असे स्वतःहून सांगितले नाही. ते स्वतः उपीट बनवून खायचे. हे लक्षात आल्यावर आम्ही काकांच्या जेवणाचे नियोजन करू लागलो.

४. सेवेची तीव्र तळमळ

अ. श्री. जमदाडेकाका त्यांच्याकडील सेवा पुष्कळ बारकाव्यानिशी आणि परिपूर्ण करतात.

आ. काकांची २ मुले नोकरीनिमित्त आणि शिक्षणासाठी बाहेर होती. त्या कालावधीत काका घरी एकटेच होते. त्यांना त्यांचे भाऊ गावाला बोलावत होते; मात्र ‘गावाला गेल्यावर तिथे सेवा उपलब्ध होणार नाही. इथे मला सेवा करता येते’, या विचाराने काका गावाला गेले नाहीत. पलूस येथे त्यांना घरातील सर्व कामे करावी लागायची, खानावळीत जेवण जेवावे लागायचे; मात्र सेवेसाठी त्यांनी हे सर्व त्रास सोसले आहेत. अजूनही ‘मी जोपर्यंत स्वतःची कामे स्वतः करू शकतो, तोपर्यंत इथे राहून सेवा करणार आहे’, अशी त्यांची तळमळ आहे.

इ. ते या दळणवळण बंदीच्या आधीपर्यंत पलूस येथे प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण पायी चालत करत होते. त्याबद्दल काकांनी कधीही गार्‍हाणे केले नाही. थंडी, पाऊस, वारा या स्थितीतही आणि वयाच्या ७० व्या वर्षीही ते दैनिकाचे वितरण करत आहेत.

५. गुरुदेवांवरील अढळ श्रद्धा

काका साधनेत आल्यावर त्यांचे कुटुंबीयही साधना करू लागले. काकांच्या मुलीचा विवाह ठरल्यावर काकू पाहुण्यांना विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी मुलाच्या समवेत दुचाकी वर गेल्या होत्या. त्या घरी परतत असतांना त्यांचा अपघात होऊन डोक्याला मार लागला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. घरात लग्नकार्य ठरलेले असतांना ही दुःखद घटना घडली; मात्र काकांची गुरुदेवांवरील श्रद्धा जराही ढळली नाही. ते गुरुदेवांवरील श्रद्धेमुळे सेवारत राहिले. मुलीचा विवाह होऊन ती सासरी गेल्यावर घर सांभाळणारी स्त्री नव्हती. त्या वेळेत काकांनी घर सांभाळून सेवाही केली.

‘परात्पर गुरु डॉक्टर, केवळ आपल्या कृपेनेच काकांची ही गुणवैशिष्ट्ये लक्षात आली’, त्याविषयी आपल्या चरणी कृतज्ञता !’

– कु. शिल्पा बर्गे, श्री. शिवाजीराव बर्गे आणि सौ. सत्त्वशीला बर्गे, पलूस, जि. सांगली. (ऑगस्ट २०२०)