प्रेमभाव असणारे आणि तळमळीने सेवा करून साधकांच्या व्यष्टी-समष्टी साधनेची घडी बसवणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे जळगाव सेवाकेंद्रातील श्री. यशवंत सहस्रबुद्धे (वय ६७ वर्षे) !
१. उत्साही आणि आनंदी
‘श्री. सहस्रबुद्धे काका या वयातही तरुणांना लाजवेल, अशा उत्साहाने सेवा करतात. काका रात्री ११ वाजता झोपून पहाटे ४ वाजता उठतात. त्यानंतर ‘प्राणायाम करणे, वैयक्तिक आवरणे, आश्रमातील देवपूजा करणे, व्यष्टी आढावा देणे’, असा त्यांचा नित्यक्रम आहे. काका त्यात कधीच सवलत घेत नाहीत. काकांनी कधीच ‘कंटाळा आला आहे’, असे म्हटल्याचे ऐकले नाही किंवा त्यांच्या संदर्भात तसे कधी जाणवले नाही. काका सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत उत्साही आणि आनंदी असतात.
२. सकारात्मकता
काका नेहमी सकारात्मक असतात. त्यांना कुणी कुठलीही सेवा ऐनवेळी सांगितली किंवा त्यांच्यासाठी एखादी सेवा नवीन असेल, तरी ते सकारात्मक राहून ती सेवा पूर्ण करतात. ते ‘मला हे जमणार नाही’, असे कधीच सांगत नाहीत. ‘त्यांच्या शब्दकोशात ‘नाही’ हा शब्दच नाही’, असे वाटते.
३. मनमोकळेपणा आणि सहजता
काका अनोळखी व्यक्तीशी लगेच जवळीक साधतात आणि आधीची ओळख असल्याप्रमाणेच त्यांच्याशी बोलतात. ते आश्रमातील संत आणि सर्व साधक यांच्याशी सहजतेने अन् मनमोकळेपणाने बोलतात. ते अन्य साधकांना मनमोकळेपणाने बोलण्यासाठी प्रोत्साहन देतात.’
– जळगाव सेवाकेंद्रातील सर्व साधक
४. प्रेमभाव
‘काका सर्वांना हवेहवेसे वाटतात. ते साधकांवर वडिलांप्रमाणेच प्रेम करतात. एकदा मला गावी जायचे होते. माझी गाडी सकाळी ७ वाजता होती. मी माझे आवरत होते. तेव्हा काकांनी मला चहा करून दिला. तेव्हा माझा भाव जागृत झाला. माझी लहान बहीण जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या सेवेसाठी आली होती. नंतर तिला गावी जाण्यास सोबत हवी होती. त्याच काळात काकांना एका सेवेनिमित्त तिकडे जायचे होते. तेव्हा काका मला म्हणाले, ‘‘तू काही काळजी करू नको. मी तिला गावी पोचवतो.’’ त्यांनी माझ्या बहिणीला घरी पोचवल्यावर माझ्या बाबांशीही ओळख करून घेतली. माझ्या बहिणीने नंतर मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘काकांनी प्रवासात माझी चांगल्या प्रकारे काळजी घेतली.’’
५. इतरांना साहाय्य करणे
काकांकडे कुणी कधीही साहाय्य मागितले, तर ते लगेच साहाय्य करतात. ते ‘आता मला अमुक सेवा आहे. मला वेळ नाही किंवा माझा वैयक्तिक वेळ त्यात जाईल’, अशी कारणे सांगत नाहीत. ते सर्वांना सांगतात, ‘‘केव्हाही काहीही अडचण आली, तरी मला सांगा. आपण एकमेकांना साहाय्य करूया.’’ काका दिवसभर सेवा आणि व्यष्टी साधना करणे, यांत व्यस्त असतात, तरीही ते स्वयंपाक करणे, उन्हाळा असल्याने माठात पाणी भरणे, सरबत आणि चहा बनवणे, फळे चिरणे, रात्री स्वयंपाकघरात भाजी निवडणे, चिरणे, आदी सेवांमध्ये प्रतिदिन साहाय्य करतात. ते अन्य साधकांनाही त्यांच्या सेवांची आठवण करून देतात.
६. स्वीकारण्याची आणि शिकण्याची वृत्ती
‘स्वयंपाकघरातील एखादी सेवा कशी करायची ?’, हे काकांना ठाऊक नसेल, तर ते ‘ती सेवा कशी करायची ? सेवेतील बारकावे, पालट किंवा नवीन कार्यपद्धती’, हे सर्व जाणून घेऊन शिकण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे ते भ्रमणभाष आणि संगणक यांतील नवीन गोष्टीही शिकून घेतात.
७. सेवेची तळमळ
७ अ. पुढाकार घेऊन सेवा करणे : जळगाव सेवाकेंद्रातील सर्व साधकांना काकांचा आधार वाटतो. आम्हा सर्वांपेक्षा ते वयाने मोठे आहेत. ते आश्रमातील सर्वच गोष्टी दायित्व आणि पुढाकार घेऊन करतात. काका सद्गुरु जाधवकाकांसाठी पाणी आणि गायीचे दूध आणणे, या सेवाही करतात.
७ आ. ‘साधकांनी व्यष्टी साधना चांगली करावी’, यासाठी प्रयत्नशील असणे : काकांनी दळणवळण बंदीच्या काळात जळगाव येथील एक सेवा करणार्या साधकांचा गट सिद्ध केला आहे. पूर्वी ही सेवा करणारे साधक सेवा कार्य म्हणून करायचे; पण आता काकांमधील तळमळीमुळे ही सेवा करणारे साधक व्यष्टी साधना चांगल्या प्रकारे करू लागले आहेत.
७ इ. सेवाकेंद्रातील सेवांचे नियोजन करणे : काकांनी आश्रमातील स्वच्छता सेवांचे व्यवस्थित नियोजन केले आहे. काका ८ ते १० दिवसांनी नियोजनात पालट करतात. त्यांनी नियोजन केल्यावर साधकांना सेवा करायला अडचण येत नाही. काकांनी करून दिलेल्या नियोजनानुसार साधक नियमित आणि वेळेत स्वच्छता सेवा करतात. त्यामुळे सेवाकेंद्रातील साधकांची सेवा आणि व्यष्टी साधना यांची चांगली घडी बसली आहे.
७ ई. संतसेवा तळमळीने आणि भावपूर्ण करणे : सकाळी काका सद्गुरु जाधवकाकांच्या खोलीतील स्वच्छता आणि पूजा भावपूर्णरित्या करतात. ते सद्गुरु जाधवकाकांच्या कपड्यांना इस्त्री करतात, तसेच त्यांच्या जेवणाचे नियोजन करतात. काकांनी ‘सद्गुरु जाधवकाकांच्या खोलीत कूलर बसवणे, त्यांचे इस्त्रीचे कपडे अडकवण्यासाठी व्यवस्था करणे’, या सेवा स्वतःहून केल्या आहेत.
८. भाव
काका व्यष्टी साधनेचे प्रयत्न भावपूर्णरित्या करतात. त्यांनी केलेले भावजागृतीचे प्रयत्न ऐकून साधकांचा भावजागृती होतो. साधकांना त्यांच्याकडून शिकता येते. ते भावपूर्णरित्या आरती करतात. आरतीच्या वेळी गुरुपादुकांचे स्मरण करतांना त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू येतात.
९. जाणवलेले पालट
९ अ. प्रतिक्रिया न्यून होणे : ‘पूर्वी काकांना पुष्कळ प्रतिक्रिया यायच्या, उदा. साधकांची चूक होणे, अहवाल वेळेत न देणे किंवा त्यात चूक होणे इत्यादी प्रसंगी प्रतिक्रिया यायच्या. आता ते साधकांना समजावून सांगतात.
९ आ. मायेची ओढ अल्प होणे : काही दिवसांपूर्वी काकांच्या पत्नीला बरे नव्हते. तेव्हा काका घरी गेले होते. काकांना ‘तिथून लवकर सेवाकेंद्रात यावे आणि सेवा चालू करावी’, असे वाटत होते.’
– कु. सुप्रिया आचार्य, जळगाव
९ इ. फलकावर सर्व चुका लिहिणे : ‘आधी काका फलकावर चुका लिहित नसत. एकदा सद्गुरु जाधवकाकांनी सर्वांना फलकावर चुका लिहिण्याची जाणीव करून दिली. आता सहस्रबुद्धेकाका सेवाकेंद्रातील फलकावर नियमितपणे सर्व चुका लिहितात.’
– जळगाव सेवाकेंद्रातील सर्व साधक (७.६.२०२०)