निनावी दूरभाष करून मुंबईत ४ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती देणार्‍या २ युवकांना अटक !

पोलिसांनी रात्रभर राबवली शोधमोहीम !

मुंबई पोलिसांच्या वेळेचा अपव्यय करणार्‍यांवर कठोर कारवाईच व्हायला हवी ! – संपादक

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई – ६ ऑगस्टच्या रात्री उशिरा रेल्वे पोलिसांना निनावी दूरभाष करून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, भायखळा आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवले आहेत, असे खोटे सांगणार्‍या २ युवकांना पोलिसांनी अटक केली आहे. राजू अंगारे आणि रमेश शिरसाट अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या दूरभाषमुळे पोलिसांनी रात्रभर बॉम्बशोधक पथकाच्या साहाय्याने शोधमोहीम राबवली; मात्र यामध्ये पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

दोन्ही युवकांना पोलिसांनी ठाणे येथून कह्यात घेतले आहे. या युवकांनी मद्याच्या नशेत पोलिसांना दूरभाष केला असल्याचे आढळून आले. दोघेही मूळचे जालना येथील रहिवासी आहेत. दूरभाषवरून खोटी माहिती देऊन त्यांनी दूरभाष बंद ठेवला होता. पोलिसांनी केलेल्या अन्वेषणात गंमत म्हणून अशा प्रकारे दूरभाष केल्याचे युवकांनी सांगितले आहे. याप्रकरणी पोलिसांचे पुढील अन्वेषण चालू आहे.