‘१०.५.२०२१ या दिवशी हडपसर, पुणे येथील साधिका श्रीमती वृंदा विलास कुलकर्णी यांचे निधन झाले. त्यानिमित्त पुणे येथील सहसाधकांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. श्री. नारायण पाटील
१ अ. यजमानांच्या निधनानंतर कष्ट करून मुलांचे संगोपन करणे : ‘मुले लहान असतांनाच श्रीमती वृंदा कुलकर्णी यांच्या यजमानांचे निधन झाले. काकूंनी कष्ट करून मुलांचे शिक्षण पूर्ण केले. काकूंची मुलेही त्यांची काळजी घेत असत.
१ आ. काकूंच्या नातींना त्यांचा फार लळा होता.
१ इ. नियमितपणे व्यष्टी साधना करणे : काकू नियमित व्यष्टी साधना करून आढावा देत. त्यांना काही कारणास्तव व्यष्टी साधनेचा आढावा द्यायला जमले नाही, तर त्या भ्रमणभाष करून तसे कळवत असत.
१ ई. सेवेची तळमळ
१ ई १. जिज्ञासूंमध्ये सत्संगाची आवड निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे : काकूंच्या बोलण्यात गोडवा होता. त्या सत्संग परिणामकारक होण्यासाठी प्रयत्न करायच्या. ‘जिज्ञासूंमध्ये सत्संगाची आवड निर्माण होऊन ते सत्संगात कायमस्वरूपी कसे जोडले जातील’, यासाठी काकू प्रयत्नरत असायच्या.
१ ई २. ‘समाजात सनातनची सात्त्विक उत्पादने आणि सनातनचे ग्रंथ पोचावेत’, यासाठी काकू तळमळीने प्रयत्न करायच्या.
१ उ. भाव : परात्पर गुरु डॉक्टरांविषयी बोलतांना त्यांचा भाव दाटून येत असे. ‘परात्पर गुरु डॉक्टर समवेत आहेत’, असा त्यांचा भाव होता.
१ ऊ. काकूंना घरात श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवायचे.’ (मे २०२१)
२. श्रीमती पद्मा मोकाशे
२ अ. हसतमुख : ‘वृंदाकाकू सतत हसतमुख असत. त्या आनंदाने सेवा करत असल्याने त्यांच्या समवेत सेवा करणार्या साधकांनाही उत्साह वाटून सेवेतील आनंद मिळत असे.
२ आ. प्रेमभाव
१. काकू सेवेनिमित्त घरी येणार्या साधकांना वेगवेगळे पदार्थ करून प्रेमाने खाऊ घालत.
२. घरात एखादा प्रसंग घडल्यावर माझे मन अस्वस्थ झाल्यास मी काकूंच्या घरी जात असे. त्या वेळी काकू मला योग्य दृष्टीकोन देऊन ‘आपण नेमके कुठे चुकतो’, याची प्रेमाने जाणीव करून देत.
२ इ. उत्साहाने आणि आनंदाने सेवा करणे
१. काकू ४ – ५ वर्षांपूर्वी घरापासून दूर ठिकाणी जाऊन प्रवचन घेणे, प्रदर्शन कक्षात सेवा करणे, वाचकांना साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ देणे, अशा सेवा करायच्या. ‘जिज्ञासूंना संपर्क करणे आणि त्यांना सत्संगाला जोडण्यासाठी उद्युक्त करणे’, या सेवाही काकू उत्साहाने अन् आनंदाने करत.
२. दळणवळण बंदीच्या पूर्वी काकूंच्या घरी एखादा सत्संग असल्यास त्या उत्साहाने सत्संगाची सिद्धता करायच्या.
२ ई. श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्यावर दृढ श्रद्धा : काकूंची भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुमाऊली यांच्यावर अपार श्रद्धा होती. त्या श्रीकृष्णाशी बोलत सेवा करायच्या. त्यामुळे त्या सतत आनंदी असायच्या. त्या ‘माझ्या समवेत कृष्ण आहे’, असे नेहमी सांगायच्या. प.पू. गुरुदेवांच्या स्मरणाने काकूंना भावाश्रू येत. (मे २०२१)
३. सौ. माधुरी मिलिंद तडवळकर
३ अ. ‘काकू प्रत्येक साधकाकडून शिकण्याचा प्रयत्न करायच्या.
३ आ. इतरांना समजून घेणे : काकू प्रत्येक साधकाची प्रकृती आणि स्थिती यांचा विचार करून योग्य दृष्टीकोन देत. त्यामुळे प्रत्येकाला त्यांचा आधार वाटायचा. साधक त्यांनी सांगितलेल्या गोष्टी सहजतेने स्वीकारत.
३ इ. इतरांना साहाय्य करणे : साधकांनी ‘व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न भावपूर्णरित्या करावेत’, असे त्यांना वाटत असे. त्यासाठी काकू साधकांना आईच्या मायेने साहाय्य करायच्या.’ (मे २०२१)
४. सौ. रिमा संतोष नान्नीकर
४ अ. व्यवस्थितपणा आणि नीटनेटकेपणा : ‘वृंदाकाकूंचे घर कायम स्वच्छ असायचे. त्यांच्या घरातील वस्तू नेहमी जागेवर आणि व्यवस्थित ठेवलेल्या असायच्या. त्यांच्या स्वयंपाकघरातील साहित्याची रचनाही व्यवस्थित असे.
४ आ. स्वावलंबी : त्यांचे वय अधिक असूनही त्या बरीचशी कामे स्वतःच करायच्या. त्या बाहेर जाऊन किराणा साहित्य, भाजीपाला, दूध आदी वस्तू आणायच्या. ‘माझ्यामुळे साधकाला त्रास व्हायला नको’, असा त्यांचा विचार असायचा.
४ इ. जिज्ञासूंशी जवळीक साधून त्यांना साधनेत जोडून ठेवणे आणि आधार देणे : काही वर्षांपूर्वी काकू समाजात जाऊन सत्संग आणि बालसंस्कारवर्ग घेत असत. त्या वेळी सत्संगाच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या महिला अजूनही काकूंची आठवण काढतात. काकूंनी त्यांना आणि अनेक जिज्ञासूंना साधनेत जोडून ठेवले आहे. त्या जिज्ञासूंना काकूंचा पुष्कळ आधार वाटायचा. त्या काकूंना घरातील वैयक्तिक प्रसंग मोकळेपणाने सांगून त्यावर उपाय विचारायच्या. काकूंनी सांगितल्याप्रमाणे कृती केल्यामुळे जिज्ञासूंच्या अडचणीही सुटायच्या.
४ ई. सेवेची तळमळ
४ ई १. प्रवचन घेण्याची सेवा अभ्यासपूर्ण आणि मनापासून करणे : वृंदाकाकू प्रवचन घेण्याची सेवा मनापासून करायच्या. प्रवचनातील विषयांचा अभ्यास करणे, त्यांची संहिता बनवणे, आदी सेवा त्या स्वतःहून करायच्या. दळणवळण बंदीच्या कालावधीत त्यांनी ‘ऑनलाईन’ प्रवचन घेण्याची सेवा केली.
४ ई २. शारीरिक अस्वास्थ्यामुळे बाहेर पडून सेवा करता येत नसल्याची खंत वाटून घरी बसून सेवा करण्यासाठी प्रयत्न करणे : काकूंना वय आणि आजारपण यांमुळे समष्टी सेवा करायला मर्यादा येत होत्या. त्यामुळे त्या सांगायच्या, ‘‘मला समष्टीसाठी नामजप करण्याची सेवा सांगू शकता. त्यामुळे माझी घरबसल्या सेवा होईल.’’ ‘शारीरिक अस्वास्थ्यामुळे सेवा होत नाही’, याची त्यांना पुष्कळ खंत वाटत असे.
४ ई ३. तपासणीसाठी आधुनिक वैद्यांकडे गेल्यावर तिथेही सेवेसाठी प्रयत्न करणे : तपासणीसाठी ‘फॅमिली डॉक्टरां’कडे जातांना ‘तिथेही साधना कशी होईल ?’, असा काकूंचा विचार असायचा. काकूंच्या तळमळीमुळे त्यांचे ‘फॅमिली डॉक्टर’ ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि विज्ञापनदाते म्हणून सनातनशी जोडले गेले आहेत. काकूंनी या डॉक्टरांच्या चिकित्सालयातील महिला कामगारांनाही साधना सांगितली होती. (मे २०२१)
५. कु. स्नेहल कांबळे
५ अ. काकूंच्या घरी गेल्यावर मला ‘वेगळ्या ठिकाणी आले आहे’, असे न वाटता स्वतःच्या घरी आले आहे’, असे वाटत असे.
५ आ. काकू त्यांच्या आगाशीत लावलेल्या झाडांचीही प्रेमाने काळजी घ्यायच्या.
५ इ. तत्त्वनिष्ठ : एकदा माझ्याकडून ताटामध्ये अन्न तसेच राहिले होते. तेव्हा काकूंनी ‘प.पू. गुरुदेवांना ताटात अन्न टाकलेले आवडत नाही’, असे सांगून प्रेमाने मला माझ्या चुकीची जाणीव करून दिली, तसेच अन्नाचे महत्त्वही पटवून दिले. (मे २०२१)
६. सौ. छाया राऊत
६ अ. सकारात्मक आणि आनंदी : काकू रुग्णाईत असतांनाही सकारात्मक आणि आनंदी होत्या. त्या नामजप तळमळीने आणि भावपूर्णरित्या करायच्या. ‘त्यांची साधना चांगली चालू आहे’, असे जाणवत होते. (मे २०२१)