कोरोना रुग्णांसाठी गुणकारी ठरलेल्या अश्‍वगंधा औषधावर ब्रिटनमध्ये संशोधन !

कुठे आधुनिक वैद्यक शास्त्राची टिमकी वाजवून आयुर्वेदाला न्यून लेखणारे भारतातील कथित विज्ञानवादी, तर कुठे आयुर्वेदावर संशोधन करून त्याचा स्वतःच्या देशाला लाभ मिळवून देऊ पहाणारा ब्रिटन ! ‘पिकते तेथे विकत नाही’, हेच यावरून सिद्ध होते !

कोरोना झालेल्या रुग्णांना अश्‍वगंधाच्या औषधांचा चांगला लाभ

नवी देहली – भारतात अभ्यासाअंती ‘कोरोना झालेल्या रुग्णांना अश्‍वगंधापासून बनवण्यात आलेल्या आयुर्वेदाच्या औषधांचा चांगला लाभ झाला आहे’, हे सिद्ध झाले आहे. भारतातील या यशानंतर या औषधावर आता प्रथमच भारताबाहेर संशोधन होणार आहे. यासाठी भारत आणि ब्रिटन यांच्यात एक करार झाला आहे.


१६ मास आणि १००हून अधिक बैठकांनंतर आयुष मंत्रालयाची ‘अखिल भारतीय आयुर्वेद संस्था’ आणि ब्रिटनमधील ‘लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन’ यांनी या औषधावर ब्रिटनच्या ३ शहरांतील कोरोना रुग्णांवर चाचणी घेऊन अभ्यास करण्याचे निश्‍चित केले आहे. ‘अखिल भारतीय आयुर्वेद संस्थे’च्या संचालिका आणि या प्रकल्पातील सहसंयोजिका डॉ. तनुजा मनोज नेसारी म्हणाल्या, ‘‘येत्या ९० दिवसांत ब्रिटनमध्ये लिसेस्टर, बर्मिंगहॅम आणि लंडन येथे कोरोनाच्या २ सहस्र रुग्णांवर अभ्यास केला जाणार आहे.

त्यानंतर ९० दिवस तुलनात्मक अभ्यास केला जाणार आहे. भारतात अश्‍वगंधा औषधाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. कोरोनाची दीर्घकालीन लक्षणे न्यून करण्यात या औषधाचा चांगला परिणाम होत असल्याने कोरोनाच्या उपचारांत हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.’’