महामारीपासून रक्षण करणारी लसीकरणाची प्रभावी पद्धत इंग्रजांनी पद्धतशीरपणे नष्ट करणे

‘गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण जग कोरोना महामारीशी लढत आहे. या महामारीवर लस (वॅक्सिन) बनवणे किती कठीण आहे, हे आपण सर्वजण पहात आहोत. पाश्चात्त्य जगाने आता २०० वर्षांपूर्वी महामारीवर लसीचा उपाय शोधला आहे; मात्र आपल्या भारतीय चिकित्सा पद्धतीमध्ये ही गोष्ट शेकडो वर्षांपासून आहे. इंग्रज भारतात येण्यापूर्वी आपण अशा अनेक महामारींचा यशस्वीपणे सामना केला आहे. प्रस्तुत लेखात ‘चेचक’सारख्या आजारांवर भारतात केले जाणारे लसीकरण आणि इंग्रजांनी ते पद्धतशीरपणे कसे संपवले ? याविषयी माहिती दिली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

१. पूर्वजांनी संसर्गजन्य रोगांपासून रक्षण होण्यासाठी ‘शीतलामातादेवीचे व्रत’ लसीकरणाच्या रूपात प्रस्थापित करणे

भारतीय पुराणांमध्ये शीतलामातादेवीचे एक वेगळे महत्त्व आहे. स्कंद पुराणामध्ये शीतलामातेचा उल्लेख आहे. देवीच्या आराधनेचे स्तोत्र ‘शीतलाष्टक’रूपात उपलब्ध आहे. त्यात असलेल्या वंदना मंत्राने हे स्पष्ट होते की, शीतलामाता ही स्वच्छतेची अधिष्ठात्री आणि महामारी नष्ट करणारी देवी आहे, अशी सहस्रो वर्षांपासून लोकांची धारणा आहे. प्राचीन काळापासून भारतीय समाजातील पूर्वजांनी या देवीच्या व्रताला महामारीवर विजय मिळवण्यासाठी लसीकरणाच्या रूपात प्रस्थापित केले होते. संसर्गजन्य रोग, महामारी आदींपासून रक्षण करण्यासाठी एक पूर्ण ‘इको सिस्टम’ शीतलामाता व्रताच्या रूपात निर्माण करण्यात आली होती. गावागावांत शीतलामातेचे मंदिर बांधण्यात आले होते. तसेच महामारीपासून रक्षण करण्यासाठी या देवीच्या व्रतासमवेत कडुनिंबाच्या पानांनी स्नान करण्यापासून एक परिपूर्ण व्यवस्था निर्माण करण्यात आली होती.

२. ऐतिहासिक ग्रंथ आणि इंग्रजांचे दस्तावेज (पत्र अन् भाषण) यांतही भारतीय लसीकरणाचा उल्लेख असणे

१० व्या शतकामध्ये आयुर्वेदाच्या ‘साक्तीय ग्रंथम्’मध्ये या लसीकरण विधीचा उल्लेख आहे. स्वत: इंग्रजांनी या संपूर्ण ‘इको सिस्टिम’च्या वैशिष्ट्यांचे वर्णन केले आहे. प्रख्यात गांधीवादी आणि चिंतक धरमपाल यांनी त्यांच्या ‘१८ व्या शतकातील भारताचे विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या पुस्तकामध्ये इंग्रजांची दोन उदाहरणे दिली आहेत. यात प्रथम आहे आर्. कोल्टचे ! ‘ओलिव्हर कोल्टला, १० फेब्रुवारी १७३१ या दिवशी लिहिलेले पत्र’ या पत्रामध्ये कोल्ट यांनी बंगालमधील चेचकच्या लसीकरणाचे विवरण दिले आहे.

दुसरा उल्लेख एका विस्तृत भाषणाचा आहे. हे भाषण वर्ष १७६७ मध्ये डॉ. जॉन झेड्. हॉलवेल यांनी ‘भारतामध्ये चेचकची पारंपरिक लसीकरणाची पद्धत’ या विषयावर लंडनच्या ‘कॉलेज ऑफ फिजिशियन’चे पदाधिकारी आणि सदस्य यांच्यासमोर दिले होते.

याखेरीज या परंपरागत आणि प्रभावी लसीकरण पद्धतीवर अनेक पुस्तके लिहिण्यात आली आहेत. यात डेव्हिड अर्नाल्ड यांच्या ‘कोलोनाइजिंग द बॉडी’ या  पुस्तकाचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. अर्थात हे स्पष्टच आहे की, जगात लसीकरणाची कल्पना आणि पद्धत आम्ही भारतियांनीच सहस्रो वर्षांपूर्वी शोधून काढली आहे. त्या पद्धती पौराणिक श्रद्धेशी जोडल्या गेल्या. त्यामुळे त्या सहजपणे स्वीकारल्या गेल्या आणि प्रभावी झाल्या; परंतु दुर्दैवाने लसीकरणाचे श्रेय हे एडवर्ड जेनर यांना दिले जाते, ज्यांनी पुष्कळ नंतर, म्हणजे वर्ष १७९६ मध्ये टीकेचा (व्हॅक्सिनचा) शोध लावला.

३. इंग्रजांनी भारतीय लसीकरण व्यवस्था कशा प्रकारे नष्ट केली ? याचे सनदी अधिकारी श्रीमती लीना मेहंदळे यांनी केलेले वर्णन

वरिष्ठ सनदी अधिकारी म्हणून काम केलेल्या श्रीमती लीना मेहंदळे यांनी एका लेखाद्वारे ‘चेचकसारख्या महामारीशी लढण्यासाठी मूळ भारतीय व्यवस्था कशी होती ? आणि इंग्रजांनी तिला कसे नष्ट केले ?’, याविषयी सविस्तर सांगितले आहे.

४. ब्रिटनचे प्रा. ओर्नोल्ड यांनी भारतीय लसीकरणाविषयी विस्तृत लेखन करणे

वर्ष १८०२ मध्ये इंग्लंडचे एडवर्ड जेनर यांनी चेचक रोगावर लस शोधली. ती गायीवर आलेल्या चेचकच्या फोडांपासून बनवली जात होती. तिचा शोध लागण्याच्या पूर्वीच भारतात मुलांवर आलेल्या चेचकच्या फोडांपासून लस बनवून दुसर्‍या मुलांचे रक्षण करण्याची पद्धत होती. यासंदर्भात ब्रिटनचे प्रा. ओर्नोल्ड यांनी पुष्कळ काम केले आहे.

काही वर्षांपूर्वी मला पुण्यावरून डॉ. देवधर यांचा दूरभाष आला होता. ते ‘अमेरिकन जर्नल फॉर हेल्थ सायन्स’ साठी लंडनचे प्रो. ओर्नोल्ड यांनी लिहिलेल्या ‘कोलोनायझिंग बॉडी’ एका पुस्तकाचे समीक्षण करत आहेत. हे सांगण्यासाठी त्यांनी मला दूरभाष केला होता. या पुस्तकाचा विषय होता, ‘प्लासीची लढाई अर्थात् वर्ष १७५६ पासून भारताच्या  स्वातंत्र्यापर्यंत.’ इंग्रजांनी त्यांच्या शासनकाळात भारतात प्रचलित असलेल्या महामारींना थांबवण्यासाठी काय केले, हे लिहिण्यासाठी ओर्नोल्ड यांनी इंग्रज अधिकार्‍यांकडून २०० वर्षांच्या काळात लिहिलेले अनेक जिल्हा ‘गॅझेटियर’ आणि सरकारी धारिकांचा अभ्यास केला. त्यात त्यांना जे जे आढळले, त्यांचा या पुस्तकात उल्लेख करण्यात आला आहे. पुस्तकाच्या ३ अध्यायांमध्ये चेचक, प्लेग, कॉलरा या ३ महामारींविषयी विस्ताराने लिहिले आहे. अन्य प्रकरणे विश्लेषणात्मक आहेत.

५. चेचकच्या महामारीपासून रक्षण करण्यासाठी भारतामध्ये श्रद्धेवर आधारित लसीकरणाची पद्धत –

५ अ. चेचकला शीतलामातेचे रूप समजले जाणे

१७ व्या, १८ व्या आणि १९ व्या शतकांमध्ये किंवा कदाचित् त्याच्याही काही शतकांपूर्वी चेचकच्या महामारीपासून वाचण्यासाठी आपल्या समाजामध्ये एक विशेष व्यवस्था होती. त्याचे विवरण देतांना ओर्नोल्ड यांनी काशी आणि बंगाल यांच्या सामाजिक व्यवस्थांविषयी अधिक माहिती दिली आहे. चेचकला शीतलामाताच्या नावाने ओळखले जात होते. शीतलामातेचा प्रकोप झाल्यामुळे हा आजार होतो, असे समजले जात होते. या आजाराशी लढण्यासाठी जी समाजव्यवस्था निर्माण करण्यात आली होती, त्यात धाार्मिक भावनांचा चांगल्या पद्धतीने वापर करण्यात आला होता. शीतलामातेला प्रेम आणि सन्मानाने आमंत्रित करण्यात येत होते. तिची पूजा करण्याची व्यवस्था करण्यात येत होती. चैत्र मासात ‘शीतला उत्सव’ही साजरा करण्यात येत होता. याच मासात झाडांना नवीन पालवी फुटते आणि फुले येतात. तसेच याच मासात शीतलामाता, म्हणजे चेचकचा प्रकोप होणे चालू होते. शीतलामातेला बंगालमध्ये बसंती-चंडिका या नावानेही ओळखले जाते.

५ आ. काशीच्या गुरुकुलांतील शिष्यांनी गावागावांत जाऊन चेचक न आलेल्या मुलांना एकत्र करणे

याच काळात काशीच्या गुरुकुलांमधून गुरूंचा आशीर्वाद घेऊन शिष्य बाहेर पडायचे. त्यांना सोपवण्यात आलेल्या गावांमध्ये पूजा करण्यासाठी जायचे. ४ ते ५ शिष्यांचा गट बनवून त्यांना ३० ते ४० गावे सोपवण्यात येत होती. गुरूंच्या आशीर्वादाच्या समवेत चांदी किंवा लोखंडाचे ब्लेड, सुया आणि कापसाच्या बोळ्यांमध्ये गुंडाळलेल्या काही वस्तू समवेत घेऊन ते बाहेर पडायचे. या शिष्यांचा गावांमध्ये चांगला सन्मान होत होता. त्यांच्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकून त्याप्रमाणे पालन केले जायचे. ते ज्या मुलांना शीतलामातेचा आशीर्वाद मिळालेला नसेल (ज्यांना चेचकचा आजार झाला नसेल) अशा १५ वर्षांच्या मुलांना एकत्र करायचे.

५ इ. एकत्र केलेल्या मुलांना विधीपूर्वक लसीकरण केले जाणे

एकत्र केलेल्या मुलांच्या हातावर जवळच्या ब्लेडने हळूहळू खुरपून एखादा थेंब रक्त निघेल एवढा व्रण (जखम) करायचे. त्यानंतर कापसाचे बंडल उघडून त्यात गुंडाळलेल्या वस्तू त्या व्रणावर रगडायचे. थोड्या वेळाने दुखणे बंद झाल्यावर मुलगा खेळण्यासाठी सिद्ध होत होता. नंतर त्या मुलांवर लक्ष ठेवले जायचे. त्यांच्या आई-वडिलांशी भेटून त्यांना समजावून सांगण्यात येत होते की, मुलांच्या अंगात शीतलामाता येणार आहे. तिच्या मानसन्मानासाठी मुलांना काय खायला दिले पहिजे ? हेही ते सांगायचे. अर्थात् ते पथ्याच्या दृष्टीने ठरत होते. १-२ दिवसांत मुलांना चेचकचे फोड येत होते आणि थोडा तापही यायचा. या वेळी मुलांची काळजी घेतली जायची आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या जायच्या. पूजापाठ चालू ठेवणे, हे ब्राह्मण शिष्यांचे दायित्त्व होते. देवी आशीर्वादाच्या रूपात आली आहे, तर तिचा प्रकोप होऊ नये, यासाठी ते शिष्य पूजा करायचे. फोड मोठे होऊन पिकत होते आणि नंतर कोरडे होत होते. हे सर्व चक्र ८ ते १० दिवसांमध्ये पूर्ण होत होते. त्यानंतर प्रत्येक मुलाला कडूनिंबाच्या पानांनी अंघोळ घालून त्यांची पूजा केली जायची, तसेच त्यांना गोड खाऊ घालायचे. अशा प्रकारे अनुमाने १० दिवसांमध्ये शीतलामाता त्या मुलाच्या शरिरातून निघून जात होती. त्यामुळे ‘जीवनभर त्यांच्यावर शीतलामातेचा प्रकोप कधीच होणार नाही’, असा मुलांना आशीर्वाद मिळत होता. त्याच ८ ते १० दिवसांमध्ये ब्राह्मण शिष्य चेचकच्या फोडांचे परीक्षण करून त्यातूनच काही मोठमोठे पिकलेले फोड निवडायचे. तो फोड सुईने फोडायचा आणि त्यातून निघणारा पस स्वच्छ कापसाच्या लहान लहान बोळ्यांमध्ये भरून ठेवून द्यायचा. नंतर काशीला गेल्यावर अशा प्रकारचे सर्व बोळे गुरूंकडे जमा करण्यात येत होते. तेच बोळे पुढील वर्षी उपयोगात आणले जायचे.

५ ई. सामाजिक व्यवस्थेच्या रूपात भारतीय लसीकरणाची पद्धत अस्तित्वात असणे

वरील सर्व वर्णन बघून मी दंग झाले. थोडक्यात म्हटले, तर हा सर्व ‘पल्स इम्युनाएझेशन प्रोग्रॅम’ होता. जो रुग्णालयांविना एका सामाजिक व्यवस्थेच्या स्वरूपात चालवला जात होता. ब्राह्मणांकडून करण्यात येणारे विधी, उपचार किंवा पथ्य एक प्रकारे नियंत्रणाचेच साधन होते. या पुस्तकातील सर्व माहिती बंगाल आणि काशी येथील आहे; परंतु मला ठाऊक आहे महाराष्ट्रामध्ये, तसेच देशाच्या अन्य भागांमध्ये ‘शीतला सप्तमी’ व्रत साजरे केले जाते. तसेच प्रत्येक गावाच्या शिवारात एकतरी शीतलामातेचे मंदिर हे असतेच.

६. चेचकचा आजार बरा करण्यासाठी भारतीय लसीकरणाची प्राचीन पद्धती :

६ अ. शीतलामाता मंदिराच्या पुजार्‍यांना चेचकच्या उपचारांसाठी बोलावले जाणे

शीतलामाता मंदिराचे पुजारी बहुतांश माळी समाजाचे किंवा बंगालमध्ये मालाकार समाजातील असायचे. आजाराच्या उपचारांसाठी त्यांनाच बोलावले जाई. माळी आल्यानंतर तो घरी मांसाहार वर्ज्य करायला सांगायचा. तूप, तेल आणि मसाले हे ही बंद करण्यात येई. रुग्णाच्या मनगटाला काही कवड्या, काही हळदीचे तुकडे आणि सोन्याचा अलंकार बांधण्यात येत असे. त्याला केळीच्या पानांवर झोपवण्यात येत असे आणि दुधाचा आहार दिला जायचा. त्याला कडुनिंबाच्या पानांची हवा दिली जायची. त्याच्या खोलीत प्रवेश करणार्‍याला अंघोळ करूनच प्रवेश दिला जात होता. शीतलामातेच्या पंचधातूच्या मूर्तीचा अभिषेक करून ते चरणोदक रुग्णास पिण्यास दिले जायचे. रात्रभर शीतलामातेचे गीत गायले जात असे. लेखक ओर्नोल्ड यांनी एका संपूर्ण गीताचा इंग्रजीत अनुवादही केला होता, जो मातेच्या प्रार्थनेसाठी गायला जात होता. चेचकच्या दाण्यांची जळजळ न्यून करण्यासाठी शरिरावर बारीक केलेली हळद, मसूर डाळीचे पीठ किंवा शंखभस्म यांचा लेप दिला जायचा. ७ दिवस कलशपूजाही करण्यात येई, ज्यात तांदुळाची खीर, नारळ, कडुनिंबाची पाने इत्यादींचा महाप्रसाद बनवण्यात येत होता. चेचकचे फोड पिकल्यानंतर उष्णता न्यून करण्यासाठी धारदार काट्याने त्याला फोडून त्यातून पू काढून टाकला जाई. त्यानंतर एक आठवडाभर आजारी व्यक्तीची ‘प्रत्येक इच्छा ही मातेची इच्छा’ समजून पूर्ण करण्यात येत होती आणि मातेला सन्मानाने निरोप दिला जात होता.

६ आ. देशातील बहुतांश राज्यांत शीतलामातेची पूजा होणे

शीतलामातेचे एक मोठे मंदिर गुडगाव (गुरुग्राम) येथे होते. तेथे मोठी जत्रा भरायची. उत्तर भारत, राजस्थान, बिहार, बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये लहान लहान मंदिरे होती. तेथे चैत्र मासात शीतलामातेच्या पर्वासाठी यात्रा आणि मेळे लागायचे. आजार न होऊ देण्याचे दायित्व ब्राह्मणाकडे होते. जे गावागावांत जाऊन लसीकरण करायचे. या पद्धतीला भारतभरात चांगला प्रतिसाद मिळत होता. आजार झाल्यावर रोग्याची व्यवस्था पहाण्याचे दायित्व माळ्यांकडे होते. अशा प्रकारे आपण पहातो की, ‘इम्युनायझेशन’साठी आजारी व्यक्तीलाच साधन बनवण्याचा सिद्धांत आणि चेचकसारख्या आजारामध्ये लसीकरण करण्याची पद्धत, हा भारतात लागलेला शोध होता. हे १३ ते १८ व्या शतकापर्यंत उत्तर भारताच्या सर्व भागांत प्रचलित होते.

७. भारतीय लसीकरणाची पद्धत देशातील विविध भागांत प्रचलित असणे :

अ. वर्ष १८३९ मध्ये राधाकांत देव (१७८३-१८६७) यांनी भारतीय लसीकरणाच्या पद्धतीची विस्तृत माहिती देणारे पुस्तक लिहिले आहे. ओर्नोल्ड म्हणतो की, ‘हॉलवेल किंवा डॉ. देव हे लिहू शकले नाही की, लसीकरणाची ही पद्धती समाजात किती खोलवर उतरली होती; परंतु १८४८ पासून १८६७ या कालावधीतील बंगालमधील सर्व कारागृहांचे आकडे सांगतात की, ८० टक्के कैद्यांनी भारतीय पद्धतीचे लसीकरण केलेले होते. आसाम, बंगाल, बिहार आणि ओडिशा येथे न्यूनतम ६० टक्के लोक लस घ्यायचे. ओर्नोल्ड यांनी वर्णन केले आहे की, बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये वर्ष १८७० च्या दशकामध्ये चेचकशी संबंधित अनेक जनगणना करण्यात आल्या. अशीच एक जनगणना वर्ष १८७२-७३ मध्ये झाली होती. त्यानुसार १७ सहस्र ६९७ लोकांपैकी ६६ टक्के लोकांनी देशी पद्धतीने लसीकरण करून घेतले होते. ५ टक्के लोकांनी ‘व्हॅक्सिनेशन’ (इंग्रजांचे लसीकरण) केले होते. १८ टक्के लोकांचा चेचक निघाला होता आणि अन्य ११ टक्के लोकांना अजूनर्यंत कोणतीही सुरक्षा मिळाली नव्हती. बंगाल प्रेसिडेन्सीच्या बाहेर काशी, कुमॉऊ, पंजाब, रावळपिंडी, राजस्थान, सिंध, कच्छ, गुजरात आणि महाराष्ट्रातील कोकण या भागांत ही पद्धत प्रचलित होती. देहली, नेपाळ, भाग्यनगर आणि मैसुरू येथे या पद्धतीचे कोणतेही संकेत मिळाले नाहीत. मद्रास प्रेसिडेन्सीच्या काही भागांमध्ये ओरिया ब्राह्मणांकडून लसीकरण करण्यात येत होते. यासाठी त्यांना चांगले शुल्क मिळायचे. अनेक भागांमध्ये महिलांना टीका लावल्यावर केवळ अर्धेच शुल्क मिळायचे.

८. ब्राह्मणांव्यतिरिक्त अन्य समाजघटकांनीही भारतीय लसीकरणाची पद्धत आत्मसात करणे

राधाकांत देव यांच्या मते भारतीय लसीकरण करण्याचे काम ब्राह्मणांशिवाय आचार्य, ज्योतिषी, कुंभार, सांकरिया (शंखवाले) तसेच न्हावी समाजाचे लोकही करायचे. बंगालमध्ये माळी समाजाचे, बालासोरमध्ये मस्तान समाजाचे, बिहारमध्ये पछानिया समजाचे लोक, मुसलमानांमध्ये कोष्टी आणि सिंदूरिये वर्गाचे लोक, कुणबी, तसेच गोव्यात कॅथॉलिक चर्चचे पाद्रीही लस टोचण्याचे काम करायचे. लस टोचण्याच्या काळात अर्थात् फाल्गुन, चैत्र, बैसाख या मासांत प्रत्येक मासात शंभर-सव्वाशे रुपयांची कमाई होत होती. त्या काळातील ही पुष्कळ चांगली कमाई समजली जात होती. काही गावांमध्ये त्यांचा विशेष लसीकरण करणारा असायचा. अनेक कुटुंबांत ही पिढीजात कला चालत आली होती. लेखकाच्या मते, लसीकरणाची हा विधी ब्रिटनमध्येही हळूहळू मान्यता पावत होता. बंगालमधील अनेक इंग्रज परिवारानेही अशा प्रकारे लसीकरण करून घेतले होते.

९. ब्रिटीश डॉ. एडवर्ड जेनर यांनी लसीचा शोध लावणे आणि भारतियांवर ती थोपवली जाणे

वर्ष १७९६ मध्ये डॉ. एडवर्ड जेनर (वर्ष १७४९-१८२३) याने गायीच्या चेचकच्या फोडांपासून चेचकची लस बनवण्याचा शोध लावला. हा एका ब्रिटीश आधुनिक वैद्याचा शोध आणि पद्धत होती. त्यामुळे त्यावर तात्काळ विश्वास ठेवण्यात आला आणि त्याला भारतात तात्काळ लागू करण्याची शिफारस करण्यात आली, जेणेकरून ब्रिटीश सैनिकांचे आरोग्य सुरक्षित रहावे. या लस बर्फाच्या पेट्यांमध्ये ठेवून भारतात आणल्या जात होत्या. त्यानंतर भारतियांना चेचकच्या लस दिल्या जात होत्या. लसीकरणाची पद्धत बरोबर तीच होती, जी भारतीय लोक वापरायचे; परंतु या पद्धतीचे नाव पडले, ‘व्हॅक्सिनेशन !’ यासाठी मोठ्या प्रमाणात सक्ती करण्यात येत होती. ‘जर एखाद्या भारतीय व्यक्तीने ब्रिटिशांची लस घेतली नाही, तर पुढे आपल्याला चेचक निघतील आणि ते महामारी पसरवण्याला कारणीभूत होईल’, अशी ब्रिटीश आधुनिक वैद्यांना भीती वाटायची.

प्रारंभीच्या काळात इंग्रजांच्या लसीकरणाची पद्धती पुष्कळ क्लेशदायक होती. त्यांचे मोठे व्रण पडायचे. त्यामुळे लहान मुले आणि म्हातारी माणसे ते लावून घेतांना रडायची. ‘जेनर विधी’च्या अंतर्गत लसीकरण केल्यानंतर त्या ठिकाणी व्रण पडत होते आणि तापही यायचा; परंतु चेचकचे दाणे उभरून येत नव्हते. अनेक वेळा लसीकरणाचा तीव्र ताप येऊन व्यक्तीचा मृत्यूही व्हायचा. त्यामुळे त्याला भारतियांचा अधिक विरोध होता.

१०. ब्रिटीश संशोधक जेनरने नवीन लस (व्हॅक्सिन) शोधून काढल्यामुळे इंग्रजांनी भारतीय लसीकरणाचा कार्यक्रम बंद पाडण्याचा आटोकाट प्रयत्न करणे :

जेव्हा वर्ष १७९८ मध्ये सर जेनरने गायीच्या अंगावर निघालेल्या चेचकच्या दाण्यांपासून ‘व्हॅक्सिन’ बनवण्याची पद्धती शोधून काढली, तेव्हा त्याचे इंग्लंडमध्ये मोठे स्वागत झाले होते. ‘आता त्या जादूटोणावाल्या देशाच्या लसीऐवजी आम्ही आमच्या डॉक्टरांच्या पद्धतीचा वापर करणार’, असे लोकांचे मत बनले. जशी जेनरची पद्धती हातात पडली, इंग्रजांना वाटले की, याखेरीज दुसरी पद्धत खोटी आहे आणि ती थांबवली पाहिजे. जेनरची पद्धती सर्वप्रथम वर्ष १८०२ मध्ये मुंबईमध्ये आणि त्यानंतर बंगालमध्ये चालू करण्यात आली. त्यानंतर ब्रिटीशांनी भारतातील लसीकरणाची पद्धती अर्थात्, ‘वेरीओेलेशन’ समाप्त करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. ‘वेरिओलेशन’ पद्धतीने लसीकरण करण्यावर बंदी घालण्यात आली. असे लसीकरण करणार्‍यांना कारागृहात पाठवण्यात आले. अनुमाने वर्ष १८३० नंतर चेचकच्या संदर्भात इंग्रजांनी लिहिलेले जेवढेही अहवाल मिळाले, त्यात ‘वेरिओलेशन’ पद्धती (भारतीय पद्धती) खोटी ठरवण्यात आली. तसेच भारतीय आणि त्यांची अंधश्रद्धा यांच्यावर भरपूर टीका करण्यात आली. ‘ते (भारतीय) जेनर साहेबांच्या ‘व्हॅॅक्सिन’सारख्या अनमोल रत्नाला फेटाळत होते, जे त्यांना डॉक्टरांच्या कृपेने मिळत होते’, अशी टीका करण्यात आली. भारतीय देशी पद्धतीच्या लसीकरणाला ‘मृत्यूचा व्यापार’ म्हटले गेले.

भारतियांनी ब्रिटिशांच्या ‘व्हॅक्सिनेशन’ला त्वरित डोक्यावर घेतले नाही. त्यामुळे अनेक ब्रिटीश अधिकार्‍यांना राग आला. शूलब्रेडने भारतियांना मूर्ख, अज्ञानी आणि प्रत्येक नवीन शोधाचे शत्रू म्हटले. (वर्ष १८०४) डंकन स्टेवार्ट याने (वर्ष १८४०) अकृतज्ञ आणि मूढ म्हटले. वर्ष १८७८ मध्ये कोलकाताचे सॅनिटरी कमिशनरने त्यांना अंधश्रद्धाळू, रुढीवादी आणि जातीयवादी म्हटले. ‘भारतीय लसीकरण पद्धतीमुळेच लोक ब्रिटिशांच्या ‘व्हॅॅक्सिन’ला महत्त्व देत नाहीत’, असे त्यांना वाटत होते.

११. भारतीय लसीकरणाला बंद पाडण्यासाठी ब्रिटिशांनी लसीकरण करणार्‍या बाह्मण शिष्यांना कारागृहात टाकणे :

इंग्रजांना वाटायचे की, जोपर्यंत काशीचे ब्राह्मण शिष्य त्यांचे ‘वेरिओलेशन’ (लसीकरण) करत आहेत, तोपर्यंत त्यांच्यासाठी आव्हान कायम राहील. ते थांबवण्यासाठी त्यांनी देशी लसीकरणाला अशास्त्रीय घोषित केले आणि शीतलामातेचा टीका लावणार्‍या ब्राह्मणांना कारागृहात पाठवणे चालू केले. तेव्हा ब्राह्मणांनी त्यांची विद्या गावागावांतील सोनार आणि न्हावी यांना शिकवली. अशा प्रकारे त्यांच्या माध्यमांतूनही देशी लसीकरणाचा कार्यक्रम काही वर्षे चालू राहिला. ज्या सोनार आणि न्हावी यांना ही विद्या शिकवण्यात आली, त्यांची नावे ‘टीकाकार’ अशी पडली. आजही बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये टीकाकार नावाचे अनेक परिवार आढळून येतात, जे मूळत: सोनार किंवा न्हावी यांच्या जातीतील असू शकतात. बहुदा त्यांच्या वंशजांना हे ठाऊक नसेल की, त्यांचे हे नाव त्यांना कसे मिळाले.

१२. ब्रिटिशांची लसीकरणाची पद्धती भारतीय लसीकरणाहून अधिक कष्टदायक असणे :

अ. लसीकरणाची इंग्रजी पद्धत लोकप्रिय न होण्याला एक कारण हेही होते की, अनेक वर्षांपर्यंत इंग्रजी पद्धतीमध्ये अडचणी होत्या. १९ व्या शतकाच्या शेवटपर्यंत ही पद्धत पुष्कळ क्लेशदायक होती. भारतामध्ये गायींना चेचकचा आजार होत नव्हता. गायीच्या चेचकचा पू (ज्याला ‘व्हॅक्सिन’ म्हटले गेले) इंग्लंडवरून आणला जात होता. त्यानंतर बगदादवरून मुंबईपर्यंत त्याला मुलांच्या साखळीने आणण्यात येत होते. म्हणजे एखाद्या मुलाला गायीच्या ‘व्हॅक्सिन’ने लस टोचायची. त्यानंतर त्याचा व्रण पिकल्यावर त्यातून पस काढून पुढील मुलाला लस टोचण्यात येत होती.

आ. नंतर गायीच्या ‘व्हॅक्सिन’ला काचेच्या बाटलीत बंद करून पाठवण्यात येऊ लागले. परंतु उकाड्यामुळे किंवा विलंबामुळे त्याचा प्रभाव नष्ट होत होता. त्यामुळे त्यात मोठमोठे किडेही निर्माण होत होते. उष्ण वातावरणात लसीकरण परिणामकारक होत नव्हते. त्यामुळे ६ मासांनंतर ही पद्धत बंद करावी लागत असे. पुढील वर्षी पुन्हा मुलांची साखळी बनवूनच लसीकरणासाठी ‘व्हॅक्सिन’ भारतात आणणे शक्य होते. युरोप आणि भारतात काही लोकांनी हा मुलांवरील अन्याय असल्याचे म्हटले. तसेच या पद्धतीमुळेच ‘सफिलस’ किंवा कुष्ठरोग पसरतो, असे समजले जायचे.

इ. वर्ष १८५० मध्ये मुंबईमध्ये लसीकरण विभागाने गायीच्या वासरूंमध्ये ‘व्हॅक्सिनेशन’ करून त्या पसापासून लस बनवण्याचा प्रयत्न केला; परंतु हा उपाय खर्चिक होता. वर्ष १८९३ मध्ये बंगालचे ‘सॅनेटरी कमिशनर’ डायसनने लिहिले की, इंग्रजी पद्धतीमध्ये १ वर्षाहून अल्प वयाच्या मुलाला लस दिली जात होती. ज्या मुलाचा व्रण पिकला असेल, त्या मुलाला दुसर्‍या गावाला नेऊन त्याच्या व्रणातील पू काढून अन्य मुलांना लस टोचली जात होती. अनेक वेळा व्रण जोराने दाबून पू काढला जात होता. त्यामुळे कुटुंबातील लोक रडायचे किंवा तडफडायचे. मुलाला लस लावून घेणारे लोकही रडायचे; कारण त्यांच्या मुलाचीही पुढे अशीच स्थिती होणार होती. गावकर्‍यांना वाटायचे की, या लसीकरणापासून वाचण्याचा एकच उपाय होता की, त्यांना चांदीचे नाणे देण्यात यावे. हे योग्य आहे. कारण या विधीमध्ये मुलांना कोणताच आजार होत नव्हता. त्याला चेचकचे फोड निघायचे नाही, जेव्हा की भारतीय पद्धतीत ५० ते १०० चेचकचे फोड येत होते. तरीही एकूण भारतीय पद्धत कष्टदायक नव्हती. जे काही असेल, ते शीतलामातेची इच्छा समजून स्वीकारले जात होते.

१३. भारतीय लसीकरणाचा काही प्रतिष्ठित इंग्रजांनीही प्रचार करणे

१३ अ. डॉ. हॉलवेल यांनी भारतीय लसीकरणाचे पुष्कळ कौतुक करणे

वर्ष १७६७ मध्ये डॉ. हॉलवेल यांनी भारतीय लसीकरणाची विस्तृत माहिती लंडनच्या ‘कॉलेज ऑफ फिजिक्स’मध्ये मांडली होती आणि त्याचे पुष्कळ कौतुक केले होते. ही पद्धत इंग्लंडमध्ये नवीन आली होती. तेव्हा याविषयी हॉलवेल त्यांना आश्वस्त करू इच्छित होते. हॉलवेल यांनी सांगितले की, लसीकरणासाठी भारतीय वैद्य मागील वर्षाच्या पूचा उपयोग करायचे. तसेच हा पू त्याच मुलाचा घेतला जात होता, ज्याला टीकेच्या माध्यमातून शीतलामातेचे दाणे देण्यात आले असेल. अर्थात ज्याचा ‘कंट्रोल एनवायर्नमेंट’ राहिला असेल. लसीकरण करण्यापूर्वी कापसातील औषधाला गंगाजल शिंपडून पवित्र करण्यात येई. तेव्हा घर आणि घराच्या आसपासच्या पर्यावरणावर विशेष लक्ष ठेवले जात होते. वयस्कर व्यक्ती किंवा गर्भवती महिला यांना वेगळ्या घरांमध्ये ठेवले जात असे, जेणेकरून त्यांच्यापर्यंत आजाराचा संसर्ग पसरणार नाही. हॉलवेल यांच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण कार्यक्रमाच्या काळात कुणाही मुलाला ना तीव्र आजारपण यायचे, ना त्याचे संक्रमण अन्य व्यक्तीपर्यंत पोचायचे ! हा संपूर्णपणे सुरक्षित कार्यक्रम होता.

तसे पाहिले, तर ‘ब्रिटानिका एनसायक्लोपीडिया’मध्ये ‘१८ व्या शतकाच्या आरंभी चेचकपासून वाचण्यासाठी लस देण्याची एक प्रथा भारतापासून आरंभ होऊन अफगानिस्तान आणि तुर्कस्तान मार्गाने युरोमध्ये विशेषत: इंग्लंडमध्ये पोचली होती’, असा उल्लेख आहे. ज्याला ‘वेरिओलेशन’ हे नाव देण्यात आले होते. वास्तविक आधुनिक वैद्य (डॉक्टर) याला ‘पोकळवासा’ समजत होते. तरीही ज्यांना इंग्लंडच्या समाजात चांगला सन्मान होता, असे अनेक प्रतिष्ठित लोक याचा प्रचार करायचे. वर्ष १७६७ मध्ये हॉलवेलने एक विस्तृत विविरण लिहून इंग्लंडच्या जनतेला ‘वेरिओलेशन’च्या संदर्भात आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. लक्षात ठेवा, तोपर्यंत ‘जेनर पद्धती’सारखी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नव्हती.

१३ आ. बुचानन याने भारतीय पद्धतीमधील अनेक चांगल्या गोष्टींचे वर्णन करणे

शूलब्रेडच्याच समकालीन बुचानन याने भारतीय पद्धतीमधील अनेक चांगल्या गोष्टींचे वर्णन केले आहे. वर्ष १८६० मध्ये कोलकाताचे ‘व्हॅक्सिनेशन’चे सुपरीटेंडन्ट जनरल चार्लस ने लिहिले आहे की, ‘जर सर्व उपचारांचे योग्य प्रकारे पालन झाले, तर भारतीय पद्धतीमध्ये चेचकची महामारी पसरण्याची कोणतीही शक्यता नाही. तथापि मी ‘व्हॅक्सिनेशन’ला (ब्रिटीश पद्धतीला) अधिक योग्य समजतो. तरीही माझी एक सूचना आहे की, भारतीय लस टोचणार्‍यावर बंदी घालण्याऐवजी त्यांची नोंदणी करून त्यांना त्यांच्या पद्धतीने लसीकरण करण्याची अनुमती द्यावी.’ साहजिकच ही सूचना ब्रिटीश राजवटीला पसंत पडली नाही.

१४. शास्त्रीय गोष्टी केंद्रीभूत असणार्‍या उत्सवांचा मूळ गाभा काळाच्या ओघात लुप्त होणे

आमच्या जुन्या सर्व कर्मकांडांमध्ये एका लहानशा शास्त्रीय गोष्टीला केंद्रस्थानी ठेवून त्यावर उत्सव आणि कर्मकांड यांचे एक भरभक्कम आवरण चढवण्यात येत असे. ते आवरण दिसून पडत होते; कारण त्यामध्ये चमकधमक होती. त्याकडे पाहून लोक कृती करायचे आणि ते अनेक वर्षे लक्षात ठेवायचे. आजही ठेवतात. त्यामुळे बहुतांश मूळ गोष्टीचा आत्मा, म्हणजे ते लहानसे शास्त्रीय काम ज्याच्यासाठी हा सर्व व्याप लावण्यात आला होता, तो काळाच्या ओघात लुप्त होत होता. त्याचे जाणकारही काळाच्या नियमाप्रमाणे जग सोडून जायचे. आजही महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये अशी प्रथा आहे की, चैत्र मासात लहान लहान मुले डोक्यावर तांब्याचा कलश घेऊन नदीमध्ये स्नानाला जातात. त्यांना कडुनिंबाच्या पानांनी सजवले जाते. त्यानंतर ओल्या अंगाने देवीच्या मंदिरापर्यंत येऊन कलशातील पाणी शीतलादेवीवर ओतले जाते आणि काही स्वत:च्या डोक्यावर उडवले जाते. अशा प्रकारे शीतलासप्तमीचे व्रतही प्रसिद्ध आहे, जे श्रावण मासामध्ये केले जाते.

१५. भारतीय कुटुंबांमध्ये महिलांकडे आयुर्वेदाचे ज्ञान असल्यामुळे त्यांना मानसन्मान मिळणे :

प्रारंभीपासूनच आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारामध्ये विकेंद्रीकरणाला मोठे महत्त्व ठेवण्यात आले, जे आधुनिक केंद्रीकरण आणि रुग्णालये यांच्या व्यवस्थापनाहून पूर्ण भिन्न आहे. आयुर्वेदाच्या विविध सिद्धांतांना अत्यंत लहान लहान कर्मकांडे आणि चालीरिती यांमध्ये वाटून घराघरांत पोचवले गेले. त्या सिद्धांताच्या अनुपालनामध्ये कुटुंबातील महिला सदस्यांना महत्त्वाचे स्थान होते. त्यामुळे आयुर्वेदाचे ज्ञान महिलांजवळ सुरक्षित रहात होते आणि बहुतांश त्यांच्याच माध्यमांतून उपयोगात आणले जात होते. भारतीय स्त्रियांना कुटुंबामध्ये सन्मानाचे स्थान मिळण्याची जी कारणे होती, त्यात आरोग्याचेही एक महत्त्वपूर्ण कारण होते. हे आयुर्वेदाचे ज्ञान स्त्रियांकडून शेजारच्या लोकांसाठीही उपयोगात आणले जायचे. जर कोणते कुटुंब आर्थिक अडचणीत आले, तरच हे ज्ञान कुटुंबातील पुरुषांच्या माध्यमातून अर्थसंचयासाठी प्रयुक्त करण्यात येत होते. कुटुंबातील स्त्रियांचा सन्मान घटण्यामागे हेही एक कारण आहे की, आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्य रक्षणाचे ज्ञान आता त्यांच्याकडून काढून घेतले गेले आहे.

१६. फार पूर्वी औषधी न देता रुग्णांना पथ्य करायला लावून त्यांचा आजार बरा करणे :  

चेचक किंवा मसुरिका आजारांच्या विषयामध्ये चरक किंवा सुश्रुत संहितांमध्ये अत्यंत अल्प वर्णन आढळून येते. त्यावरून लक्षात येते की, ५ व्या शतकामध्ये या आजाराची भयावहता अधिक नव्हती. याउलट ८ व्या शतकामध्ये प्रसिद्ध आयुर्वेदिक ग्रंथ ‘माधव निदान’मध्ये याचे विस्तृत वर्णन दिले आहे. पूर्वी आजार झाला, तर त्यावर औषधी दिली जायची नाही. केवळ पथ्यावरच जोर दिला जायचा. मांस, मासे, दूध, तेल, तूप आणि मसाले यांना अपथ्य समजले जायचे. केळी, ऊस, भात, टरबूज आदी पथ्यकर समजले जायचे. आजार ओळखल्यानंतर वैद्य, ब्राह्मण किंवा कविराज यांची कोणतीही आवश्यकता नसायची; कारण औषधांच्या आधारे नाही, तर पथ्य-अपथ्य यांद्वारेच आजार बरे केले जायचे.

१७. इंग्रजांनी पद्धतशीरपणे भारतीय चिकित्सापद्धत नष्ट करण्याचा प्रयत्न करणे

हे सर्व विवरण विस्ताराने वाचल्यावर काही प्रश्न निर्माण होतात. सर्वांत महत्त्वाचा प्रश्न हा येतो की, जेव्हा ओर्नोल्डसारख्या ब्रिटीश व्यक्तीने भारतीय चिकित्सा पद्धतीवर एवढा अभ्यास करून हे पुस्तक लिहिले, तर इंग्रजांनी त्यावर विचार का नाही केला ? याचा दुसरा अर्थ असाही निघतो की, इंग्रजांचे उदात्तीकरण करण्यासाठी त्यांना गुणग्राहकसारखे विशेषण लावून सन्मान करण्यात आला, जे चुकीचे आहे. इंग्रज हे पक्के व्यापारी होते. त्यांना प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धतीचे गुण-दोष यांच्याशी काही देणे-घेणे नव्हते. त्यांना केवळ त्यांनी बनवलेली ‘व्हॅक्सिन’, औषधी, भारतातील घराघरांत पोचवायची होती. त्यामुळे इंग्रजांनी एक अत्यंत सुव्यवस्थित चिकित्सा पद्धतीला बळजोरीने समाप्त केले.

इंग्रज गेले, तेव्हा भारतात अतिशय अल्प आयुर्वेदिक रुग्णालये आणि वैद्य शिल्लक राहिले होते. इंग्रजांनी संपूर्ण देशात ब्रिटीश चिकित्सा पद्धतीची रुग्णालये, चिकित्सालये आणि आधुनिक वैद्य (डॉक्टर्स) बनवून या देशाची प्राचीन अन् प्रगतीशील चिकित्सा पद्धतीला नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

– प्रशांत पोळ

संदर्भ :

१. Cononising the body: State Medicine and Epidemic disease in Nineteenth century India – David Amold (August 1993)

२. Medical History of British India

३. Public Health in British India : A Brief Account of the History of Medical sevices and disease prevention in colonial india-Mahammad Umair Mushtak (January 2009)

४. War against smallpox – Michael Bennet

५. The Anarchy- William Darymple

६. An Era of Darkness – Shashi Tharoor

७. १८ व्या शतकामध्ये भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान – धरमपाल

८. Medical Encounters in British India-Deepak Kumar and Raj shekhar Basu

९. The British in India-David Gilamour

१०. The social history of health and medicine in colonial india – Biswamoy pai and Mark Harrison