आपत्तींमध्ये महाराष्ट्र शोकाकुल असल्याने माझा वाढदिवस कुणीही साजरा करू नये ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुंबई – कोकण, तसेच पश्चिम महाराष्ट्र येथे निसर्ग कोपला आहे. पुरामुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबियांवर आघात झाला आहे. या आपत्तींत महाराष्ट्र शोकाकुल आहे. त्यामुळे २७ जुलै या दिवशी असणारा माझा वाढदिवस कुणीही साजरा करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.

ते म्हणाले, ‘‘वाढदिवसानिमित्त कुणीही माझे अभिष्टचिंतन करण्यासाठी मला प्रत्यक्ष भेटू नये. फलक किंवा ‘पोस्टर’ लावू नयेत. मी सामाजिक माध्यमे, तसेच ईमेल यांच्या माध्यमातून शुभेच्छा स्वीकारीन. राज्यात अद्याप कोरोनाचे संकटही कायम आहे. संभाव्य तिसर्‍या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत.’’

पूर आणि कोरोना अशा परिस्थितीत एकमेकांना साहाय्य करणे आवश्यक आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक दायित्वाचे कर्तव्य पार पाडावे’, असेही त्यांनी सांगितले.