नित्य साधना केल्याने शाश्वत विकास शक्य ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

  • ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘व्यवसाय आणि व्यावसायिक पद्धती’ या विषयावरील संशोधन इंग्लंड येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर !

  • महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत शोधनिबंधाचे लेखक !

श्री. शॉन क्लार्क

मुंबई – शाश्वत विकास आणि व्यावसायिक सामाजिक दायित्व यांच्याही पलीकडे ‘आध्यात्मिक परिणाम’ नावाचे एक सूत्र आहे. नवीन उत्पादनांची अन् सेवांची निर्मिती करतांना ते विचारात घेणे अत्यंत आवश्यक आहे. उद्योग आणि उपभोक्ता या दोन्ही घटकांना याविषयी जाणीव असणे आवश्यक आहे; कारण सातत्याने नकारात्मक स्पंदनांच्या संपर्कात राहिल्यास त्याचा व्यक्तीवर अनिष्ट परिणाम होतो. परिणामस्वरूप समाजाची हानी, तसेच वातावरणात आध्यात्मिक प्रदूषण होते. हे टाळण्यासाठी नित्य साधना करणे हाच उपाय आहे. नित्य साधना केल्याने शाश्वत विकास शक्य आहे, असे प्रतिपादन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. ते २१ जुलै २०२१ या दिवशी ॲाक्सफर्ड, इंग्लंड येथे आयोजित ‘दी सिक्सटिंथ इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इंटरडिसिप्लीनरी सोशल सायन्सेस’ या वैज्ञानिक परिषदेत बोलत होते. या परिषदेचे आयोजन ‘दी इंटरडिसिप्लीनरी सोशल सायन्सेस रिसर्च नेटवर्क अँड दी कॉमन ग्राऊंड रिसर्च नेटवर्कस्, यूके’, या संस्थेने केले होते. त्यांनी ‘व्यवसाय आणि व्यावसायिक पद्धती’ या विषयावरील संशोधनांतर्गत ‘हाऊ कॉर्पोरेशन्स अफेक्ट सोसायटी ॲट अ स्पिरिच्युअल लेव्हल’ (व्यवसायांचा समाजावर आध्यात्मिक स्तरावर कसा परिणाम होतो ?) हा शोधनिबंध सादर केला. या शोधनिबंधाचे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे लेखक आणि विश्वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.

१. त्यानंतर श्री. क्लार्क यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) वापरून करण्यात आलेल्या विपुल संशोधनातील २ प्रयोगांविषयी माहिती दिली. पहिला प्रयोग पोशाखावर होता. या प्रयोगात एका महिलेने पुढील ७ प्रकारचे पोशाख क्रमाने प्रत्येकी ३० मिनिटे परिधान केले होते – १. ‘व्हाईट इव्हिनिंग गाऊन’ (पायघोळ पांढरा झगा), २. ‘ब्लॅक ट्यूब टॉप ड्रेस’ (‘ऑफ शेल्डर’, म्हणजे खांद्यांकडे उघडा असणारा काळ्या रंगाचा पाश्चात्त्य पोशाख), ३. काळा टी-शर्ट आणि काळी पॅन्ट, ४. पांढरा टी-शर्ट आणि पांढरी पॅन्ट, ५. सलवार-कुडता, ६. सहावारी साडी आणि ७. नऊवारी साडी. तिने प्रत्येक पोशाख परिधान करण्यापूर्वी आणि केल्यानंतर ‘यू.ए.एस्.’द्वारे परीक्षण करण्यात आले.

२. त्या महिलेने पहिले ४ पोशाख परिधान केल्यानंतर तिच्यातील नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतरचे ३ पोशाख परिधान केल्यानंतर मात्र तिच्यातील नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ घट झाली. पोशाख क्र. ३ आणि ४ हे एकसारखेच होते, केवळ रंगात भेद होता, तरीही महिलेने पोशाख क्र. ३ (काळ्या रंगाचा पोशाख) परिधान केला असता पोशाख क्र. ४ च्या तुलनेत तिच्यामध्ये पुष्कळ अधिक नकारात्मक ऊर्जा दिसून आली, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. महिलेमध्ये सकारात्मक ऊर्जा केवळ तिने शेवटचे ३ पोशाख परिधान केल्यावर दिसून आली.

३. या प्रयोगातून लक्षात येते की, पोशाखाचा प्रकार आणि रंग याचा व्यक्तीवर आध्यात्मिक (ऊर्जेच्या) स्तरावर परिणाम होतो. दुसर्‍या प्रयोगात ४ प्रकारच्या संगीताचा व्यक्तीवर झालेला परीणाम यू.ए.एस्. उपकरणाच्या साहाय्याने करण्यात आला.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने वैज्ञानिक परिषदेत सादर केलेले हे ७५ वे सादरीकरण होते. यापूर्वी विश्वविद्यालयाने १५ राष्ट्र्रीय आणि ५९ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी ५ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये विश्वविद्यालयाला ‘सर्वोत्कृष्ट शोधनिबंध’ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.