-
९० सहस्र नागरिकांचे स्थलांतर !
-
नागरिकांचे प्राण वाचवण्यात सैन्याचे मोठे साहाय्य !
लोकहो, भीषण आपत्काळात तरून जाण्यासाठी साधनेविना पर्याय नाही, हे जाणून आता तरी साधनेला आरंभ करा !
मुंबई – अतीवृष्टीमुळे महाराष्ट्र राज्यातील ९ जिल्हे प्रभावित झाले आहेत. अतीवृष्टीमुळे राज्यातील ७६ जणांचा मृत्यू झाला असून ५९ जण बेपत्ता झाले आहेत. विविध ठिकाणी आलेल्या पुरामुळे ९० सहस्र नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हालवण्यासाठी ५९ बोटी मागवण्यात आल्या. राज्यात ठिकठिकाणी सैन्यदल, नौदल आणि राष्ट्रीय आपत्कालीन साहाय्य पथकाचे सैनिक यांच्या साहाय्यामुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचले. (नागरिकांना वाचवण्यासाठी तत्पर आणि कृतीशील असणार्या सैनिकांचे अभिनंदन ! – संपादक) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या गावांतील ८९० गावांना पुराचा फटका बसला. यामध्ये १६ घरे पूर्णत: नष्ट झाली. ३८ नागरिक गंभीर घायाळ झाले. पूरग्रस्त भागांत नागरिकांच्या निवार्यासाठी ४ छावण्या उभारण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ६ निवारा केंद्रे उभारण्यात आली असून त्यामध्ये २ सहस्र नागरिकांना ठेवण्यात आले आहे.
संकटात सापडलेल्या नागरिकांच्या साहाय्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले आहे. यासाठी राष्ट्रीय आपत्कालीन साहाय्य पथकाच्या एकूण २५ तुकड्या कार्यरत आहेत.
आक्रित म्हणावे अशा दुर्घटना घडत आहेत ! – मुख्यमंत्री
तळीये (महाड) – ज्याला आक्रित म्हणावे, तसेच घडत आहे. अनपेक्षित अशा दुर्घटना घडत आहेत. यातून आपल्याला आता शहाणे होण्याची वेळ आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये असे अनुभव सातत्याने येत आहेत. पावसाळा चक्रीवादळानेच चालू होतो. त्यामुळे धावपळ होते. डोंगर, दर्या, कपारी, तसेच डोंगरांच्या पायथ्याशी जेथे वस्त्या आहेत, तेथील लोकांचे सुरक्षित ठिकाणी लवकरात लवकर पुनर्वसन करावेच लागेल. सरकार त्याविषयी केवळ विचार नव्हे, तर आराखडा सिद्ध करील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ते रायगडमधील महाड तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त तळीये गावात पहाणीसाठी आले होते. या वेळी त्यांच्या समवेत मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाइकांचे ‘तुम्ही दुःखातून सावरा. बाकीची काळजी आम्ही घेऊ’, अशा शब्दांत सांत्वन केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले,
१. अशा दुर्घटना घडू नयेत आणि घडल्याच, तर जीवितहानी होऊ नये, अशा प्रकारे आपण व्यवस्थापन करत आहोत.
२. काही ठिकाणी पोचणे अजूनही दुरापास्त आहे. तेथे माणसे साहाय्यासाठी जाऊ शकतात; पण यंत्रसामुग्री जाऊ शकत नाही.
३. हानीभरपाई किंवा अन्य गोष्टी यांची पूर्तता सरकारच्या वतीने केली जाईल.