‘आई’ हा शब्द ऐकला की, प्रत्येक व्यक्तीला आधार वाटतो. सर्वांसाठी भगवंताचे सगुण रूप म्हणजे आई ! या रूपात भगवंत सर्वांच्या समवेत राहून सर्वांचा सांभाळ करतो. ज्येष्ठ कृष्ण पक्ष एकादशी (५.७.२०२१) या दिवशी माझी आई सौ. सुधा जोशी हिचा ७० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त भगवंताच्या या रूपाविषयी मी माझे बोबडे बोल तिच्या चरणी अर्पण करत आहे.
१. प्रेमळ
१ अ. आईने कुटुंबीय आणि नातेवाईक यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून प्रेमाने खाऊ घालणे : आई आमच्या नातेवाइकांवर पुष्कळ प्रेम करते. त्यांना कधी कंटाळा आला, तर ते हक्काने आमच्याकडे येऊन रहातात. माझी आई सुगरण आहे. त्यामुळे तिने केलेला साधा पदार्थही चविष्ट लागतो. सर्व कुटुंबीय आणि नातेवाईक यांना आईच्या हातचे जेवण फार आवडते. आई त्यांना आवडणारे पदार्थ आठवणीने करून खाऊ घालते. त्यामुळे सर्व जण तिच्याकडे आकर्षिले जातात. ‘आईने प्रेमाने बनवलेल्या पदार्थांनी सर्वांच्या अंतरातील भगवंताला प्रसन्न केले आहे’, असे मला वाटते.
१ आ. तिने तिच्या शांत स्वभावामुळे सर्व कुटुंबीय आणि नातेवाईक यांना प्रेमाने जोडून ठेवले आहे.
१ इ. मुलीला खाऊ पाठवतांना ओळखीच्या इतर साधकांसाठीही आठवणीने खाऊ देणे आणि घरी येणार्या चालक साधकाचे प्रेमाने आदरातिथ्य करणे : आमच्या घराजवळ विमानतळ आहे. बाहेरगावाहून येणार्या साधकांना विमानतळावरून रामनाथी आश्रमात न्यायला गाडी येते. मला काही साहित्य हवे असल्यास आई त्या गाडीतून ते साहित्य पाठवते. त्याच समवेत ती ज्या साधकांना ओळखते, त्यांच्या नावाने खाऊ पाठवते. ते साहित्य घेण्यासाठी चालक साधक घरी गेल्यावर ते आईच्या ओळखीचे असले किंवा नसले, तरी आई त्यांचे प्रेमाने आदरातिथ्य करते.
१ ई. ‘विमानप्रवास करून आलेल्या साधकांना भूक किंवा तहान लागली असेल’, असा विचार करून त्यांना आग्रहाने खाण्याचे पदार्थ देणे : ‘विमानाने गोव्याला येणार्या साधकांना भूक किंवा तहान लागली असेल’, असा विचार करून ती फळाचा रस, केळी किंवा इतर काही चांगले पदार्थ बनवले असतील, तर ते पदार्थ त्या साधकांना घरात बोलावून देते. काही साधक भिडस्तपणामुळे किंवा ‘पुढच्या प्रवासाला उशीर होईल’, या विचाराने गाडीतून उतरायला संकोच करतात. तेव्हा आई त्यांना बाटलीत घालून सरबत देते आणि खाद्यपदार्थ असेल, तर तो कागदात नीट गुंडाळून गाडीपाशी जाऊन देते.
आईचे साधकांवर फार प्रेम आहे. त्यामुळे साधक घरी आल्यावर तिला फार आनंद होतो. ‘साधक घर सोडून आश्रमात येऊन सेवा करतात; म्हणून आपण त्यांची सेवा करूया’, असा तिचा विचार असतो.
१ उ. तिने साधकांची आठवण ठेवून पाठवलेले पदार्थ ग्रहण करतांना त्या साधकांची भावजागृती होते आणि त्यांना तिच्याप्रती कृतज्ञता वाटते. ते साधक नंतर मला तसे आवर्जून सांगतात.
२. मला समजायला लागले, तेव्हापासून आईने सतत दुसर्यांचाच विचार केला. ती नेहमी इतरांसाठीच जगली.
३. कुटुंबियांकडून कोणतीही अपेक्षा नसणे
मागील ४ – ५ वर्षांपासून आईला गुडघेदुखीचा तीव्र त्रास चालू झाला आहे, तरीही ती घरची सर्व कामे आनंदाने करते. ‘कुटुंबियांनी तिला कामात साहाय्य करावे’, अशी तिची अपेक्षा नसते. ती सर्व कामे निरपेक्षपणे आणि तिचे कर्तव्य म्हणून करते. तिला कामे करायला जमत नसेल आणि कुणी साहाय्याला नसेल, तरीही तिचे काही गार्हाणे नसते.
४. त्यागी वृत्ती
इतरांना कुठल्याही वस्तू देतांना तिचा जराही संघर्ष होत नाही. मला अनेक प्रसंगांमध्ये तिला सांगावे लागायचे, ‘‘आई, ही वस्तू आपण तुझ्यासाठी ठेवूया.’’ काही वेळा वस्तू नवीन किंवा अमूल्य असली, तरी तिचा ती वस्तू इतरांना देण्याचा विचार असायचा.
५. मुलीच्या साधनेला घरून पुष्कळ विरोध असतांना आईने तिला खंबीरपणे पाठिंबा देणे आणि याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आईचे कौतुक करणे
आरंभी मला घरून साधनेसाठी पुष्कळ विरोध होता. त्या वेळी घरातील सर्वांचा विरोध आणि बोलणी ऐकून घेऊनही आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळे मी निश्चिंतपणे साधना करू शकले. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या वेळच्या बर्याच साधकांच्या कुटुंबियांना आईचे उदाहरण देऊन ‘त्यांचा आदर्श ठेवा’, असे सांगितले होते. ते मला नेहमी म्हणायचे, ‘‘तुला किती प्रेमळ आई मिळाली आहे ! आईने तुझ्यावर केलेल्या संस्कारांमुळे तू आज साधना करत आहेस. ‘त्यांनी आम्हाला ‘सोनल’ दिली’, यासाठी आम्हाला कृतज्ञता वाटते.’’
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव
आमच्या घरी आईच्या खोलीत परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र आहे. कुठलीही अडचण आली किंवा एखादी समस्या निर्माण झाली, तर आई त्यांच्या छायाचित्राच्या समोर जाऊन त्यांना आत्मनिवेदन करते. ‘परात्पर गुरु डॉक्टर तिचे सर्व बोलणे ऐकतात’, असा तिचा भाव असतो. तिच्यातील भावामुळे तिला तशा अनुभूतीही येतात.
७. प्रार्थना
‘परात्पर गुरु डॉक्टर, आई सर्वांना भरभरून प्रेम देते. आईच्या माध्यमातून तुम्ही आम्हा साधकांना तुमची प्रीती अनुभवायला दिली आहे. ‘तिच्यातील निरपेक्ष प्रीतीची शिकवण आमच्या सर्वांच्याही अंगी लवकर रुजू दे. या माध्यमातून तुम्ही तिच्याकडून साधना करवून घेऊन तिची याच जन्मात जलद आध्यात्मिक प्रगती करवून घ्यावी’, अशी तुमच्या कोमल चरणी कळकळीने प्रार्थना करते.’
– कु. सोनल जोशी (मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.६.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |