आतंकवादी ‘अंनिस’वरच जादूटोणा कायद्यांतर्गत कारवाई केली पाहिजे ! – ज्योतिषाचार्य अतुल छाजेड

रघुनाथ येमुल आणि अन्य आरोपी यांच्या विरोधात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्याची अंनिसची मागणी

ज्योतिषाचार्य अतुल छाजेड

पुणे, १९ जुलै – बाणेर येथील ज्योतिषी रघुनाथ येमुल यांनी पुण्यातील एका महिलेसमवेत जादूटोण्याचा प्रकार केल्याचा आरोप करत ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या शिवाजीनगर, पुणे शाखेने जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. याला येथील ज्योतिषाचार्य अतुल छाजेड यांनी आक्षेप घेतला असून ‘राष्ट्रद्वेषी आणि आतंकवादी ‘अंनिस’वरच जादूटोणा कायद्यांतर्गत कारवाई केली पाहिजे’, अशी मागणी केली आहे.

ज्योतिषी रघुनाथ येमुल यांनी पीडितेच्या पतीला ‘पत्नीच्या दूषित ग्रहमानामुळे तू आमदार आणि मंत्री होणार नाहीस, त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे’, असे सांगितले, असा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात चेन्नई येथील आर्.सी. बेसल आणि शहरातील जॉन या ज्योतिषांचीही नावे समोर आली असून त्यांच्याकडे पीडितेच्या पतीने भविष्याविषयी विचारणा केली होती. तसेच त्यांनी चांगली आणि वाईट वेळ यांविषयी कथन केल्याचे तपासात समोर आले आहे.

अंनिसने केलेल्या मागणीविषयी पुण्यातील ज्योतिषाचार्य अतुल छाजेड यांनी या ‘केस’मध्ये जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा संबंधच येत नाही. ‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिष हे शास्त्र नसल्याचे सिद्ध करून दाखवावे’, असे अंनिसला आव्हान दिले आहे.

त्यांनी पत्राद्वारे सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कायदामंत्री, पोलीस आयुक्त यांना ‘भारताच्या प्राचीन संस्कृतीचे अभेद्य अंग असलेल्या ज्योतिषशास्त्राची अपकीर्ती करणार्‍या अंनिसवर कारवाई करावी आणि संस्थेला निधी कुठून मिळत आहे, याचीही चौकशी व्हावी’, अशी मागणी केली आहे.

चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याला दिलेल्या निवेदनात ज्योतिषाचार्य छाजेड यांनी नमूद केले  आहे की, पोलिसांनी अंनिसच्या दबावातून आमच्यावर कारवाई केली, तर आम्हीही आमच्यावर होणार्‍या कारवाईच्या विरोधात आंदोलन करू.