‘विकिपिडीया’ संकेतस्थळावरील माहिती अविश्‍वासार्ह असून साम्यवादी विचारसरणीला पूरक !

ऑनलाईन ज्ञानकोश म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘विकिपिडीया’चे सहसंस्थापक लॅरी सँगर यांचा गंभीर आरोप !

साम्यवाद्यांनी ज्या ज्या क्षेत्रांत पाऊल ठेवले, त्या क्षेत्राची अपरिमित हानी केली, हा इतिहास आहे. साम्यवाद हा जगासाठी घातक आहे, हे लक्षात घेऊन तो हद्दपार करण्यासाठी आता जागतिक स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक !

‘विकिपिडीया’ची कार्यपद्धत !

‘विकिपिडीया’ संकेतस्थळावर जगातील जवळपास प्रत्येकच गोष्टीविषयीची माहिती विस्ताराने दिली आहे. हे संकेतस्थळ जगभरातील स्वयंसेवकांद्वारेच चालवले जाते. जगभरातील कुणीही व्यक्ती संकेतस्थळावर तिचे खाते उघडून कोणतीही माहिती पालटू शकते; परंतु त्यासाठी योग्य संदर्भ देणे आवश्यक असतात. तसेच अनुभवी स्वयंसेवकांकडून ही माहिती अंतिम व्हावी लागते. अनुभवी स्वयंसेवकांपैकी बहुतेक लोकांची विचारसरणी साम्यवादाकडे झुकलेली आहे.

लॅरी सँगर

लंडन – ऑनलाईन ‘एनसायक्लोपिडीया’ (कोणत्याही विषयावरील माहिती मिळण्याचे संदर्भ. याला ज्ञानकोश म्हणतात.) म्हणून प्रसिद्ध असलेले ‘विकिपिडीया’ हे संकेतस्थळ आता विश्‍वासार्ह राहिले नसून त्यामध्ये साम्यवादी विचारसरणीच्या लोकांचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे संकेतस्थळावर प्रसारित करण्यात येत असलेल्या माहितीवर कुणीही विश्‍वास ठेवू नये’, असा गंभीर आरोप या जगप्रसिद्ध संकेतस्थळाचे सहसंस्थापक लॅरी सँगर यांनी केला आहे. युनायटेड किंगडम येथील ‘अनहर्ड डॉट कॉम’ या संकेतस्थळावर त्यांची यासंदर्भातील मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे.

१. सँगर यांच्या मते, गतवर्षी झालेल्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी डेमोक्रॅटिक पक्षाला राजकीय लाभ मिळावा, अशा प्रकारे या संकेतस्थळाने भूमिका बजावली होती. जो बायडेन आणि त्यांचे पुत्र हंटर बायडेन यांच्यावरील गंभीर आरोपांविषयी संकेतस्थळाने भाष्य केले नव्हते. जर त्यासंदर्भात उल्लेख झाला असता, तर डेमोक्रॅटिक पक्षाला हानी सोसावी लागली असती. याचा थेट लाभ अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांना झाला असता.

२. सँगर यांनी मुलाखतीत हेही स्पष्ट केले की, ‘विकिपिडीया’मध्ये साम्यवादी विचारसरणी असलेल्या स्वयंसेवकांचा भरणा असून या विचारसरणीला मारक असलेले लिखाण ग्राह्य धरला जात नाही.

३. ‘विकिपिडीया’वरआज कोट्यवधी लोक डोळे झाकून विश्‍वास ठेवतात. कोणत्याही माहितीसाठी लोक या संकेतस्थळाचा सर्रास उपयोग करतांना दिसतात. एका अनुमानानुसार प्रत्येक मासाला हे संकेतस्थळ ६ अब्जहून अधिक वेळा पाहिले जाते, तर इंटरनेटवरील संकेतस्थळांपैकी हे ५ वे सर्वाधिक वाचकसंख्या असलेले संकेतस्थळ आहे.

४. ‘विकिपिडीया’ची स्थापना लॅरी सँगर आणि जिमी वेल्स यांनी वर्ष २००१ मध्ये केली होती. पुढे काही वर्षांनीच सँगर यांनी हे आस्थापन सोडले होते. सँगर यांनी याआधीही ‘विकिपिडीया’वर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव असल्याचे आरोप केलेले आहेत.