नक्षलवाद्यांना शस्त्रांसह साहित्य पुरवठा केल्याप्रकरणी १३ जणांना अटक !

गोंदिया येथील ६ जणांचा सहभाग !

संपूर्ण नक्षलवाद नष्ट केल्याविना अशा घटना कायमस्वरूपी संपणार नाहीत, हे लोकप्रतिनिधींच्या लक्षात कसे येत नाही ? संपूर्ण नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने सरकारने ठोस कृती करावी !


गोंदिया – गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेश राज्यातील बालाघाटमध्ये नक्षलवादी दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या भागातील नक्षलवाद्यांना साहित्य पुरवठा करणार्‍या ८ जणांना किरनापूर पोलिसांनी गेल्या आठवड्यात कह्यात घेतले होते. त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील दोघांचा समावेश होता. या आरोपींच्या चौकशीनंतर बालाघाट पोलिसांनी या प्रकरणी गोंदिया जिल्ह्यातून एका माजी नगरसेवकासह आणखी ४ जणांना कह्यात घेतले आहे. त्यामुळे साहित्य पुरवठा प्रकरणात एकूण १३ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये जिल्ह्यातील ६ आरोपींचा समावेश आहे. (नक्षलवाद्यांना साहाय्य करणार्‍यांना आजन्म कारावासाची शिक्षा होईल, अशी कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक)

एकूण १३ आरोपींना अटक करण्यात आली

आरोपींकडून ३ पिस्तुले, ‘एके ४७’, ८ भ्रमणभाष, २ चारचाकी आदी जप्त करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी नक्षलवाद्यांना ५ सहस्र काडतुसे, पिस्तूल, शस्त्रे, दारूगोळा आणि शिबिरासाठीचे साहित्य पुरवण्यासाठी १ कोटी रुपयांचा व्यवहार झाला होता. यांतील ३० लाख रुपयांचे साहित्य गेल्या ६ मासांत नक्षलवाद्यांना पुरवण्यात आले. मुख्य आरोपीच्या सूचनेवरून लपवून ठेवण्यात आलेल्या साहित्यासह १ बंदूक आणि ४९० काडतुसे चौकशीच्या वेळी हस्तगत करण्यात आली. बोरबन अरण्य परिसरातून हे साहित्य नक्षलवाद्यांपर्यंत पोचवण्यात येत होते.