हिंदूंवर अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानचे उदत्तीकरण हिंदु समाज सहन करणार नाही ! – हिंदु जनजागृती समिती

गोवंडी (मुंबई) येथील उद्यानाला क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव न देण्याची हिंदुत्वनिष्ठ संघटनांची महापौरांकडे मागणी !

वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर येऊ नये. सरकारी यंत्रणांच्या हे लक्षात येणे आवश्यक ! 

मुंबई, १४ जुलै (वार्ता.) – गोवंडी येथील ‘एम्/पूर्व’ विभागातील प्रभाग क्र. १३६ मधील साहीनाका डम्पिंग रोड येथील उद्यानास क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव देण्याचा घाट समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी घातला आहे; मात्र ‘हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे उदात्तीकरण हिंदु समाज कदापी सहन करणार नाही. त्यामुळे या उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देऊ नये’, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांनी मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर, तसेच बाजार अन् उद्यान समितीचे उपाध्यक्ष श्री. तुकाराम पाटील यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन केले आहे, तर याविषयी मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्त यांनाही निवेदन देण्यात आले आहे.

महापौरांकडून या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्‍वासन !

महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांना निवेदन देतांना डावीकडून हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद मानकर, भाजपचे वरळी विधानसभा क्षेत्राचे सचिव श्री. संघठन शर्मा आणि श्री शिवकार्य प्रतिष्ठान (विक्रोळी)चे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले

या वेळी श्री शिवकार्य प्रतिष्ठान (विक्रोळी) या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद मानकर आणि वरळी विधानसभा क्षेत्राचे भाजपचे सचिव श्री. संघटन शर्मा हे उपस्थित होते. यावर ‘टिपू सुलतान याचे मुंबईसाठी योगदान काय ? त्याचे नाव इथे कशासाठी ?’, याविषयी ‘प्रशासकीय नियम पडताळून यामध्ये मी लक्ष घालते’, असे आश्‍वासन महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी या वेळी दिले.

(डावीकडून) बाजार आणि उद्यान समितीचे उपाध्यक्ष श्री. तुकाराम पाटील यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार

निवेदनातील ठळक सूत्रे  

१. मुंबईतील विविध स्थळांना विविध धर्मांतील महनीय व्यक्तींची नावे दिली आहेत. त्याला आम्ही कधीही आक्षेप घेतलेला नाही; मात्र ज्याने दक्षिण भारतातील हिंदूंची १ सहस्र मंदिरे पाडली, लाखो हिंदु महिलांवर अत्याचार केले, लाखो हिंदूंच्या हत्या केल्या, तलवारींच्या बळावर लाखो हिंदूंचे धर्मांतर केले, अशा क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव उद्यानाला देणे हा हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रकार आहे.

२. आज क्ररकर्मा टिपू सुलतानचे नाव उद्यानाला दिले, तर उद्या औरंगजेब, बाबर, खिलजी, महंमद गजनी, महंमद घौरी, तैमूरलंग, तुघलक आदी क्रूर मोगलांची नावे देण्याची मागणी पुढे येऊ शकते. त्यामुळे हे पाप महानगरपालिकेने आपल्या माथी घेऊ नये.

नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी बाजार आणि उद्यान समितीला पत्र लिहून उद्यानाला टिपू सुलतान नाव देण्याची मागणी केली आहे. दुर्दैवाने या मागणीला महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत टिपू सुलतानचे नाव देण्याची शिफारस बाजार आणि उद्यान समितीकडे केली आहे. १५ जुलै या दिवशी होणार्‍या बाजार आणि उद्यान समितीच्या मासिक बैठकीत हा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला असून तो संमत होण्याची शक्यता आहे. (टिपू सुलतान याचे नाव देण्याचा निर्णय संमत होऊ नये, यासाठी हिंदूंनी वैध विरोध करणे चालूच ठेवावे ! – संपादक)