शिवसेनेचे कार्य घरोघरी पोचवण्यात करवीरकरांची नेहमीच साथ ! – संजय पवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना

‘शिवसेना संपर्क अभियान लक्ष्य २०२२’चा उंचगाव, गांधीनगर येथून प्रारंभ

शिवसेना संपर्क अभियानात मनोगत व्यक्त करतांना राजू यादव आणि उपस्थित शिवसैनिक

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) कोल्हापूर, १३ जुलै (वार्ता.) – शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द खरा ठरवत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार यशस्वीपणे चालू आहे. यापूर्वी शिवसेना आणि शिवसेनेचे कार्य घरोघरी पोचवण्यात करवीरकरांनी नेहमीच साथ दिली आहे. या शिवसेना संपर्क अभियानासही करवीरची जनता भरभरून प्रतिसाद देईल, असा ठाम विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी व्यक्त केला. ‘शिवसेना संपर्क अभियान लक्ष्य २०२२’चा उंचगाव, गांधीनगर येथून प्रारंभ करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

कोरोनासारख्या जागतिक महामारीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनहितासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले ! – राजू यादव, करवीर तालुकाप्रमुख

कोरोनासारख्या भयंकर संकटात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला धीर देऊन सर्वसामान्य घटकांची काळजी घेतली. कोरोना महामारीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनहितासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले. गाव तेथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक, सदस्य नोंदणी, तसेच मतदान नोंदणीचेही मोठ्या प्रमाणात काम शिवसैनिक आणि पदाधिकारी धडाडीने करतील, असे मत या वेळी शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी व्यक्त केले.

या वेळी उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवासेना विस्तारक हर्षल सुर्वे,  शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, मंजित माने, दीपक पाटील, दीपक रेडेकर, विनायक जाधव, संतोष चौगुले, अरविंद शिंदे, विराग करी, बाळासाहेब नलवडे यांसह अन्य उपस्थित होते.