मराठा, ओबीसी आरक्षण सर्वांनाच मान्य आहे, तर अडले कुठे ? – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

पुणे – मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जर केंद्र आणि राज्य सरकार दोघांनाही मान्य आहे, तर अडले कुठे ? आरक्षणाच्या मुद्यावरून तरुणांची माथी भडकावून केवळ राजकारण करायचे आहे का ? असा प्रश्‍न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केला. न्यायालयात व्यवस्थित बाजू का मांडली जात नाही ? असेही त्यांनी विचारले. तसेच सर्वांना व्यासपिठावर आणून चर्चा केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे पुणे दौर्‍यावर असून त्यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज ठाकरे पुढे म्हणाले, निवडणुकीत हे नेते मतदान मागायला येतात. तेव्हा समाजाने या नेत्यांना जाब विचारावा. आमचा वापर तर केला जात नाही ना ? याचाही समाजाने विचार करायला हवा. या वेळी त्यांनी महापालिका निवडणुकीविषयी मनसेची भूमिका काय असणार ? असे विचारले असता परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे उत्तर त्यांनी दिले आहे.