अल् कायदाच्या आतंकवाद्यांकडे सापडले श्रीराममंदिराचे मानचित्र !

काशी आणि मथुरा येथील धार्मिक स्थळांचीही मानचित्रे जप्त

आतंकवाद्यांना धर्म असतो आणि ते हिंदूंना अन् त्यांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करतात, हे पुनःपुन्हा समोर येते, हे लक्षात घ्या !

अल् कायदा आतंकवादी मसरुद्दिन आणि मिनाज

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथून ११ जुलै या दिवशी अटक करण्यात आलेल्या अल् कायदाच्या दोघा आतंकवाद्यांकडून अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणारे  श्रीराममंदिर आणि त्याच्या शेजारचा परिसर यांचे मानचित्र सापडले आहे. काशी आणि मथुरा येथील हिंदूंच्या धार्मिक स्थळांची मानचित्रेही आतंकवाद्यांकडून हस्तगत करण्यात आली आहेत. या मानचित्रांवर काही ठिकाणी खुणा करण्यात आल्या आहेत. या आतंकवाद्यांच्या अटकेनंतर कानपूर येथून तीन आणि संभल येथून एकाला अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गेल्या २४ घंट्यांत अनेकांना चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले आहे. आतंकवाद्यांनी बॉम्ब बनवण्यासाठी काडीपेटीवर लावण्यात आलेल्या दारूचा उपयोग केल्याचेही चौकशीतून समोर आले आहे. आतंकवाद्यांना त्यांच्या प्रमुखांकडून आर्थिक साहाय्य मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी २ सहस्र रुपयांत प्रेशर कुकर बॉम्ब बनवला होता.