कराड नगरपालिकेचे कचरा व्यवस्थापन कोलमडले

कराड, १२ जुलै (वार्ता.) – शहरातील घंटागाड्यांच्या नवीन निविदेची ‘वर्क ऑर्डर’ सिद्ध आहे; मात्र त्यावर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या स्वाक्षर्‍या झाल्या नसल्याने शहरातील घंटागाड्या बंद पडल्या आहेत. कराड शहरातील प्रतिदिन निर्माण होणारा अनुमाने ८ टन कचरा पडून रहात आहे. त्यामुळे कराड नगरपालिकेचे कचरा व्यवस्थापन पूर्णत: कोलमडल्याचे दिसून येत आहे.

पालिकेचे आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी कर्मचार्‍यांना विनंती केली; मात्र त्यांनी उत्तरदायित्वाचे सूत्र उपस्थित केल्यामुळे त्यांनाही काही बोलता आले नाही. त्यामुळे शहरातील घनकचरा तसाच पडून आहे. ३० जून या दिवशी जुन्या ठेकेदाराची मुदत संपली आहे. त्याला १० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. नवीन ठेकेदाराची प्रक्रिया पूर्ण झाली आहे; मात्र त्यावर नगराध्यक्षांची स्वाक्षरी नाही. नगराध्यक्षांनी ‘वर्क ऑर्डर’वर स्वाक्षरी न केल्यामुळे हा प्रश्न उद्भवला असल्याचे वाटेगावकर यांनी स्पष्ट केले आहे.