परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले टाकळी अमिया (जिल्हा बीड) येथील सनातन संस्थेचे हितचिंतक ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. हनुमंत चौधरी !
नाथ संप्रदायानुसार साधना करणारे हनुमंत चौधरी हे टाकळी अमिया (तालुका आष्टी, जिल्हा बीड) येथील रहिवासी होते. १२ जून २०२१ च्या पहाटे त्यांचे निधन झाले. १२ जुलै २०२१ या दिवशी त्यांच्या निधनाला १ मास पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने त्यांची काही गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. हनुमंत चौधरी यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्यानंतर समष्टी साधना करण्यासाठी मौन व्रत सोडणे !
पंढरपूर येथील प.पू. बालयोगी महाराज यांच्याकडून मौनाचे महत्त्व ऐकून हनुमंत चौधरी यांनी १९ वर्षे मौन व्रत धारण केले. या काळात त्यांनी नामजप आणि ग्रंथवाचन ही साधना केली होती. एप्रिल २०१७ मध्ये सनातनचे साधक श्री. वाल्मिक भुकन आणि सौ. रोहिणी भुकन यांच्या विवाहाच्या निमित्ताने ते गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना समष्टी साधना करण्याचे महत्त्व सांगितले. तसेच ‘तुम्ही मौनात केलेली साधना समाजाला सांगण्यासाठी मौन सोडावे’, असे सांगितल्यानंतर त्यांनी मौन व्रत सोडले. त्यानंतर त्यांनी ४ मास सनातनच्या आश्रमात थांबून साधना केली.
आ. ‘परात्पर गुरुदेवांचा सत्संग लाभल्यामुळे माझ्या आयुष्यातील सर्व साधनेचे फळ मला मिळाले. आता माझ्या साधनेचा शेवट गुरुदेवांच्या चरणी होणार आहे’, असा त्यांचा भाव होता.
२. हनुमंत चौधरी यांनी केलेले कार्य
अ. सनातन संस्थेविषयी असलेली आत्मियता : सनातन संस्थेवर कुणी टीकात्मक बोलल्यास हनुमंत चौधरी त्यांना योग्य भाषेत समजावून सांगायचे. ‘सनातन संस्था करत असलेल्या अध्यात्मप्रसाराच्या कार्यातून पुढे रामराज्य येणार आहे’, असे ते सांगायचे.
आ. ग्रामस्थांकडून करवून घेतलेले धर्मकार्य : टाकळी गावातील जवळपास ४० जणांकडून ते गोमातेच्या रक्षणासाठी श्रीरामाचा नामजप लिहून घेत असत. हिंदु धर्माच्या विरोधात कुणी बोलले, तर त्यांना ते तत्परतेने हिंदु धर्माची महानता सांगायचे.
– श्री. रामेश्वर भुकन, नगर, (१३.६.२०२१)