गोपनियतेचा भंग केल्याच्या प्रकरणी ‘ट्रू कॉलर’च्या विरोधात याचिका

‘ट्रू कॉलर’ मोबाईल ॲप

मुंबई –‘ट्रू कॉलर’ या ‘मोबाईल ॲप’ वापरकर्त्यांची माहिती इतर ठिकाणी ‘शेअर’ केली असून त्यांनी गोपनीयतेच्या कायद्याचा आणि ‘टेडा प्रायव्हसी’चा भंग केला असल्याचा दावा एका याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला आहे.

या प्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ला (एन्.पी.सी.आय.) नोटीस पाठवली आहे. शशांक पोस्तुरे यांनी ‘ट्रू कॉलर’च्या विरोधात ही याचिका केली आहे. शशांक यांनी याचिकेत म्हटले आहे की, ही सेवा देतांना आस्थापन वापरकर्त्यांची माहिती इतर ठिकाणी पुरवत आहे. अशा पद्धतीने माहिती परस्पर देणे, हा गोपनियतेचा कायदा आणि वापरकर्त्यांच्या डेटासंदर्भातील सध्याच्या कायदा यांचे उल्लंघन आहे.

यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित सर्वांना नोटीस पाठवून ३ आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शशांक यांनी संबंधितांना खासगी नोटीस पाठवून त्या संदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर करावे, २९ जुलैच्या पूर्वी सरकारने किंवा संबंधितांनी यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची सुनावणी २९ जुलै या दिवशी होणार आहे.

या संदर्भात ‘ट्रू कॉलर’ने दिलेल्या पत्रकामध्ये, ‘आम्हाला या जनहित याचिकेच्या संदर्भात कोणतीही माहिती अधिकृतपणे मिळालेली नाही. आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या संदर्भात वक्तव्य करू, असे म्हटले आहे.