शिवसेना संपर्क अभियानाचा मळगाव येथून प्रारंभ
सावंतवाडी – शिवसेनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संघटित करून संघटन वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू केले आहेत. या पार्श्वभूमीवर संपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील मळगाव येथे झालेल्या मेळाव्यात जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक यांना आपापसांतील मतभेद विसरून एक होण्याची हाक देण्यात आली.
शिवसेना जिल्हा संपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संपर्क दौरे आयोजित करण्यात आले आहेत. याचा प्रारंभ मळगाव येथे झालेल्या मेळाव्याद्वारे करण्यात आला. या संपर्क अभियानात माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी ‘जिल्ह्यातील नेते आणि सर्व शिवसैनिक यांनी एकसंघ होऊन काम करूया. मागील चुका आता पुन्हा करायच्या नाहीत. यापूर्वीची राजकीय परिस्थिती पुन्हा जिल्ह्यात येऊ द्यायची नाही. यासाठी सर्वांनी आता एकत्र होऊन काम करायचे’, असे आवाहन केले.
खासदार विनायक राऊत म्हणाले, ‘‘कुणी मंत्रीपदाचा दुरुपयोग करून शिवसेना संपवण्याची भाषा करत असेल, तर ते कदापीही शक्य नाही. यापुढे जिल्हा बँक, जिल्हा परिषद, नगरपालिका येथे भगवा फडकवणारच !’’
या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, विक्रांत सावंत, जान्हवी सावंत, नरेंद्र परब, रूपेश राहुल, बाबुराव धुरी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.