‘बी.एच्.आर्.’ पतसंस्थेतील फसवणूक आणि अपहार प्रकरणात भाजपचे विधान परिषदेचे आमदार चंदुलाल पटेल संशयित आरोपी !

पुणे, ८ जुलै – भाईचंद हिराचंद रायसोनी (बी.एच्.आर्.) पतसंस्थेतील फसवणूक आणि अपहार प्रकरणात एक मासापूर्वी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव शहर, जामनेर, भुसावळ, संभाजीनगर, धुळे, मुंबई, अकोला आणि पुणे या ६ जिल्ह्यांत एकाच वेळी धाडी टाकत १२ जणांना अटक केली होती. त्याच वेळी जळगाव येथील भाजपचे विधान परिषदेचे आमदार चंदुलाल पटेल यांच्या विरुद्ध अटक वॉरंट निघाले होते. त्यामुळे पटेल हेही संशयित आरोपी आहेत. पटेल हे अद्याप पसार आहेत.

आर्थिक गुन्हे आणि सायबर शाखेचे पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले की, या प्रकरणात बरेच दिवस पसार असलेल्या अवसायक जितेंद्र खंदारेला नुकतीत अटक करण्यात आली असून आतापर्यंत १८ जणांना अटक झाली आहे.

अटकेच्या भीतीने ‘बी.एच्.आर्.’च्या इंदापूर (पुणे) येथील गुंतवणूकदारांचे १०० टक्के पैसे परत केले !

‘बी.एच्.आर्.’ पतसंस्थेच्या ठेवीदारांचे केवळ ४० टक्के पैसे देऊन त्यांच्याकडून १०० टक्के पैसे मिळाल्याचे लिहून घेणार्‍या आस्थापनाने अटकेच्या भीतीने इंदापूर तालुक्यातील ६४ ठेवीदारांचे उरलेले ६० टक्के म्हणजे अनुमाने १ कोटी ७५ लाख रुपये त्यांच्या बांधावर जाऊन परत केले. पुणे शहर पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुंतवणूकदारांची फसवणूक करणार्‍यांना एकामागोमाग अटक करण्यास प्रारंभ केल्याने हे पैसे परत करण्यात आले आहेत. पुणे पोलिसांमुळेच आम्हाला पैसे परत मिळाले अशी भावना या ठेवीदारांनी व्यक्त केली आहे.