Telangana Rape Murder : अश्‍लील चित्रपट पहाणार्‍या पित्याचा स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न आणि हत्या !

भाग्यनगर (तेलंगाणा) – एका ३५ वर्षीय पित्याला अश्‍लील चित्रपट (पॉर्न) पहाण्याची सवय जडली होती. यामुळे त्याने त्याच्या पोटच्या १३ वर्षीय मुलीला एका जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती आईला सांगण्याची धमकी तिने दिल्यावर पित्याने तिच्यावर वार केला. यात तिची शुद्ध हरपली. त्यानंतर त्याने तिच्यावर अनेक वार करून तिची हत्या केली. त्यानंतर तिला तशाच अवस्थेत टाकून तो घरी गेला. पोलिसांना या प्रकरणाचा सुगावा लागल्यावर त्यांनी या नराधमाला अटक केली. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी हैद्राबाद पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे संकेतस्थळ बंद असल्याचे, तसेच अन्य ठिकाणी उपलब्ध असलेल्या पोलीस ठाण्यांच्या क्रमांकांवर संपर्क साधला असता ते क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. (हैद्राबाद पोलिसांची दुरवस्था ! – संपादक)

पोलिसांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ज्या माणसाला अटक करण्यात आली, त्याला ‘पॉर्न फिल्म’ पहाण्याची सवय जडली होती. पोलिसांना या प्रकरणात एक सीसीटीव्ही फुटेज हाती लागले असून त्यात आरोपी आणि त्याची मुलगी जंगलात चालतांना दिसत आहेत. भाग्यनगरमधील मियापूर या ठिकाणी ही घटना घडली. आरंभी आरोपीने त्याची मुलगी हरवल्याची तक्रार केली आणि सतत पोलिसांकडे ‘मुलगी सापडली का ?’, असा पाठुपरावा करत राहिला. १४ मे या दिवशी या मुलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळाल्याचेही पोलिसांनी सांगितले. मियापूरचे पोलीस उपायुक्त पी. नरसिंह राव यांनी सांगितले की, हे कुटुंब मूळचे मेहबूबनगर येथील असून मुलीची आई रोजंदारीवर काम करते.

संपादकीय भूमिका

समाजाची ढासळत चाललेली नैतिकता ! साधनाविहीन समाजाचा कितीही भौतिक विकास केला, तरी त्याचा काहीच लाभ होत नाही, हेच यातून लक्षात घेतले पाहिजे !