डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालय आणि संशोधन केंद्राचा दावा !
पिंपरी (पुणे) – कोरोनाबाधित रुग्णांवर अँटीबॉडी कॉकटेल उपचारपद्धती प्रभावी असून येथील डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालय आणि संशोधन केंद्र यांनी २ कोरोनाबाधित रुग्णांना अँटीबॉडी कॉकटेल उपचार देऊन बरे केल्याचा दावा केला आहे. मोनॉक्लोनल अँटीबॉडीजच्या वापरामुळे हा प्रयोग यशस्वी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या उपचारपद्धतीसाठी २ रुग्ण निवडले होते. त्यातील एक रुग्ण हा अतीजोखीम गटातील होता तर दुसर्या रुग्णामध्ये ताप, थकवा आणि इतर लक्षणे होती. या दोन्हीही रुग्णांना कासिरिव्हीमॅब आणि इंडिव्हीमॅब ही दोन इंजेक्शने दिल्याने रुग्णांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आला. त्यांना दिसणारी कोरोनाची लक्षणेही आढळली नाहीत. तसेच इतर कोणताही त्रास किंवा दुष्परिणाम झाले नाहीत. त्यामुळे या उपचारपद्धतीमुळे मोनॉक्लोनल अँटिबॉडीज परिणामकारक काम करत असल्याने ही उपचारपद्धती प्रभावी असल्याने आशादायी चित्र समोर आले आहे.