बनगाव येथील विद्यार्थ्यांना ‘नेटवर्क’ची अडचण असेल, तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी त्यांना साहाय्य का करत नाहीत ? प्रशासनाने भ्रमणभाष आस्थापनांशी चर्चा करून यातून मार्ग काढला पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली, तरी गावातील अशा समस्या सोडवल्या जात नसतील, तर ते प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना लज्जास्पद आहे.
गोंदिया – जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील बनगाव येथे लोकांच्या घरात भ्रमणभाषचे ‘नेटवर्क’ मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’द्वारे शिक्षण घेण्यासाठी गावातील उंच टेकडीवर असलेल्या स्मशानभूमीतील झाडावर बसून अभ्यास करण्याची वेळ आली आहे. झाडावर चढता न आलेले विद्यार्थी झाडाखालीच बसून अभ्यास करत आहेत.
१. कोरोनामुळे दीड वर्षांपासून शाळा आणि महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ शिक्षण देण्याची पद्धत चालू करण्यात आली. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना बसला आहे.
२. अनेक पालकांकडे ‘स्मार्ट’ भ्रमणभाष नसल्याने अनेकांनी कर्ज काढून भ्रमणभाष घेतले; मात्र घरी ‘नेटवर्क’ मिळत नसल्याने विद्यार्थी शिक्षण कसे घेणार ? असा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला आहे.
३. पाऊस पडल्यावरही नेटवर्क न मिळाल्याने या विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होते.
४. या संदर्भात गावातील काही उच्चशिक्षित तरुणांनी ‘जिओ’, ‘एअरटेल’, तसेच ‘व्होडाफोन’ या आस्थापनांकडे तक्रार केली आहे. या आस्थापनाच्या कर्मचार्यांनी ‘नल एरिया’ (म्हणजे खोलगट भागात असलेले गाव) मध्ये ‘नेटवर्क’ची समस्या असल्याचे सांगत हात झटकले आहेत, तसेच यावर तोडगा काढण्यासाठी कुणी पुढाकार घेत नाही.