केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार; ४३ नव्या मंत्र्यांचा शपथविधी

नवी देहली – केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार ७ जुलैला संध्याकाळी करण्यात आला. एकूण ४३ खासदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. यात प्रामुख्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे आदींचा समावेश आहे. काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदही देण्यात आले आहे. यात किरेन रिजिजू, हरदीप सिंह पुरी, अनुराग सिंह ठाकूर आदींचा समावेश आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्यासह भागवत कराड, डॉ. भारती पवार आणि कपिल मोरेश्‍वर पाटील यांचा मंत्रीपदाची शपथ घेणार्‍यांमध्ये समावेश आहे. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परिवहन मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्र्यांची त्यागपत्रे !

एकीकडे नव्या खासदारांना मंत्री बनवले जात असतांना काही मंत्र्यांनी त्यागपत्रे दिली आहेत. यांत प्रकाश जावडेकर, डॉ. हर्षवर्धन, रविशंकर प्रसाद, रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, थावरचंद गहलोत, संतोष कुमार गंगवार, बाबुल सुप्रियो, संजय धोत्रे, रावसाहेब दानवे, रतनलाल कटारिया, प्रताप चंद्र सारंगी आणि देबाश्री चौधरी यांचा समावेश आहे.