आषाढी यात्रेच्या कालावधीत ९ दिवस पंढरपूर शहरासह १० गावांत संचारबंदी लागू !

एस्.टी. बस सेवेसह सर्व खासगी वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कोरोनाच्या संसर्गामुळे सलग दुसर्‍या दिवशी होत असलेल्या आषाढी यात्रेसाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली असून १७ ते २५ जुलै या कालावधीत पंढरपूर शहरासह आसपासच्या १० गावांत संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. या संपूर्ण ९ दिवसांच्या कालावधीत पंढरपूर येथे एस्.टी. बस सेवेसह सर्व खासगी वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आषाढ शुद्ध अष्टमी म्हणजे १७ जुलैच्या दुपारी २ वाजल्यापासून संचारबंदीला प्रारंभ होणार असून २५ जुलै या दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत रहाणार आहे. यात्रा कालावधीत शासनाने अनुमती दिलेल्या भाविकांविना एकाही भाविकाला शहरात येता येणार नसून यासाठी जिल्हा सीमा, तालुका सीमा आणि शहर सीमा या ठिकाणी पोलिसांची त्रिस्तरीय नाकेबंदी केली जाणार आहे.

१. आषाढी यात्रा कालावधीत १७ ते २५ जुलै या कालावधीत केवळ शासनाने अनुमती दिलेल्या वारकर्‍यांना स्नानाची अनुमती दिली असून अन्य वारकर्‍यांना प्रतिबंध करण्यात आल्याचे आदेशही दिले आहेत.

२. मानाच्या १० पालखी सोहळ्यांना अनुमती दिली असून त्यातील प्रत्येक पालखीतील ४० भाविकांची कोरोना पडताळणी करून मगच त्यांना पंढरपूरकडे जाण्याची अनुमती दिली जाणार आहे. या सर्व ४०० वारकर्‍यांना संबंधित पालखी सोहळे पासेस देणार आहेत. अनुमती दिलेले ४०० वारकरी १० पालखी सोहळ्यांसमवेत १९ जुलै म्हणजे आषाढ शुद्ध दशमी या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत वाखरी येथील पालखी तळ येथे बसने पोचतील.

३. हे १० पालखी सोहळे वाखरी पालखी तळापासून पंढरपूर शहराच्या विसाव्यापर्यंत पायी चालत येणार आहेत. येथे १० पालखी सोहळ्यातील संतांच्या पादुका २० वारकरी घेऊन पंढरपूर शहरात पोचतील, तर उर्वरित ३८० वारकरी बसने त्यांच्या मठात पोचणार आहेत.

४. आषाढी एकादशीला पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शासकीय महापूजा करणार असून आषाढी यात्रेसाठी आलेले पालखी सोहळे २४ जुलै या दिवशी परतीचा प्रवास करणार आहेत.