सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – कोरोनाची दुसरी लाट अजून ओसरलेली नसतांना आता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ या नवीन प्रकारच्या विषाणूचा शिरकाव झालेला दिसून येत आहे. आपण आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे आणि भविष्यातही ती करू; मात्र आरोग्यक्षेत्रातील तज्ञांची उपलब्धता वाढवण्याला मर्यादा आहेत. कोरोनाची तिसरी लाट कधी येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे जनतेने कोरोनाच्या अनुषंगाने असलेल्या नियमांचे पालन करून काळजी घ्यावी. जिल्ह्यातील जनतेचे आरोग्य सक्षम राखण्यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी लवकरच निर्णय घेतला जाईल, असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला.
वेंगुर्ला येथे उभारण्यात आलेल्या ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ‘ऑनलाईन’ करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर हे ऑनलाईन सहभागी झाले होते, तर खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्यासह इतर मान्यवर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की,
१. कोरोनाच्या काळात उभारलेल्या तात्पुरत्या सुविधा, तसेच रुग्णालयांतील वीजपुरवठा सुरळीत राखणे, ऑक्सिजन टँकची सुरक्षितता तपासणे आणि ऑक्सिजनचा पुरेसा साठा करून ठेवणे, या दृष्टीने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
२. उपजिल्हा रुग्णालयाचे भूमीपूजन झाले, तेव्हा राज्यात कोरोनाचा संसर्ग नव्हता; परंतु आजच्या परिस्थितीत या रुग्णालयाच्या पूर्णत्वाचे महत्त्व विशेषत्वाने जाणवते. गेल्या दीड वर्षापासून आरोग्य यंत्रणेवर जसा ताण आहे, तसाच तो यंत्रांवरही आहे. ही यंत्रे २४ घंटे चालू आहेत. त्यामुळे काही ठिकाणी दुर्दैवी घटनाही घडल्या. अशा घटना टाळण्यासाठी विद्युत् वायरिंग तपासून घेणे, रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ करणे आवश्यक आहे.
३. गेल्या वर्षापासून आपल्यासमोर नैसर्गिक संकटांचे एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. या नैसर्गिक संकटांत प्राणहानी होऊ नये आणि मालमत्तेची हानी टाळता यावी, यासाठी प्रयत्न करणे अगत्याचे झाले आहे.
जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी संपूर्ण सहकार्य ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
या वेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘‘या रुग्णालयाला आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टींसाठी सहकार्य करू. रिक्त पदे भरण्याचा प्रयत्न करू.’’