मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा तात्काळ झाडे लावा अन्यथा पुढील कामासाठी अनुमती दिली जाणार नाही !

वनविभागाची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला नोटीस

अशी नोटीस का पाठवावी लागते ?

सावंतवाडी – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या झाराप ते खारेपाटण दरम्यान वनसंज्ञेखालील संपादित करण्यात आलेल्या भूमीत दुतर्फा झाडे तात्काळ लावण्यात यावीत अन्यथा महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्याचे काम करण्यास अनुमती दिली जाणार नाही, अशी चेतावणी वजा नोटीस सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला बजावली आहे. (शासनाच्या विभागांना काम करण्यासाठी नोटीस पाठवावी लागत असेल, तर हे विभाग सर्वसामान्य जनतेची कामे कशी करत असतील, याचा विचार न केलेला बरा ! – संपादक)

‘मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करतांना महामार्गाच्या दुतर्फा असलेली सहस्रो झाडे तोडण्यात आली. नियमानुसार त्या ठिकाणी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत आले, तरी वृक्षारोपण केलेले नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या प्रारंभीच वृक्षारोपण करावे. जिल्ह्याच्या पर्यावरणाला पूरक अशी आंबा, काजू, फणस, कोकम आदी झाडांची रोपे लावावीत. महामार्गाच्या दुतर्फा १ किलोमीटर अंतरात किती झाडे लावणार, याचा आराखडा उपवनसंरक्षक कार्यालयाला सादर करावा. ‘केवळ आम्ही झाडे लावली’, असा अहवाल चालणार नाही. वृक्षारोपणाचा वस्तूस्थितीदर्शक पंचनामा वनविभाग करणार आहे. या पावसाळी हंगामात नियमानुसार महामार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवड न केल्यास पुढील कामास अनुमती दिली जाणार नाही’, असे नोटिसीमध्ये म्हटले आहे. (शासकीय कार्यालयांत काम होईल, याविषयी जनता साशंक आहेच; पण आता एका शासकीय कार्यालयाला दुसर्‍या कार्यालयाच्या काम करण्याच्या पद्धतीविषयी साशंकता निर्माण झाल्याने स्पष्ट शब्दांत जाणीव करून देणारी नोटीस बजावावी लागणे, हे दुर्दैवीच ! – संपादक)