येत्या काही दशकांत समुद्रातील बर्फ गायब होईल !
गेल्या एका शतकात विज्ञानाने केलेल्या कथित प्रगतीचाच हा परिणाम आहे. त्यामुळे पृथ्वीला वाचवण्यासाठी अशा निसर्ग घातकी विज्ञानापासून आता दूर रहाण्याचाच प्रयत्न केला पाहिजे !
बर्लिन (जर्मनी) – जागतिक हवामान पालटामुळे होणारी हानी आता अशा पातळीवर पोचली आहे की ती सुधारता येणार नाही. त्यामुळे त्याच्यासहितच जगावे लागणार आहे, असे प्रतिपादन वैज्ञानिक प्रा. मार्कस रेक्स यांनी केले आहे. आतापर्यंतच्या उत्तर ध्रुवावरील सर्वांत मोठ्या आर्क्टिक मोहिमेचे आयोजन प्रा. मार्कस रेक्स यांनी केले होते. २० देशांतील ३०० वैज्ञानिक या शोध मोहिमेत सहभागी झाले होते. हा प्रवास ३८९ दिवस चालला आणि गेल्या ऑक्टोबरमध्ये ते जर्मनीला परतले.
१. प्रा. मार्कस रेक्स यांनी सांगितले की, आर्क्टिकमधील महासागरातून उन्हाळ्यात बर्फ गायब होणे ही हवामान पालटाची मोठी हानी आहे. येत्या काही दशकांत, समुद्रातील तापलेल्या वातावरणामुळे बर्फ समुद्रातून गायब होईल.
२. वैज्ञानिकांना उत्तर ध्रुवाच्या मोहिमेत मिळालेल्या माहितीनुसार काही दशकांत अंटार्क्टिकामधील हिमनग पूर्ण विरघळतील आणि आर्क्टिक महासागरातील बर्फ गायब होईल. या पथकाने शोधाशी संबंधित १५० टेराबाईट डेटा आणि बर्फाचे एक सहस्राहून अधिक नमुने देखील समवेत आणले आहेत.