गलवानमधील संघर्षानंतर गेल्या वर्षभरात ४३ टक्के भारतियांनी चिनी वस्तूंकडे फिरवली पाठ ! – सर्वेक्षणाचा निष्कर्ष

४३ टक्के लोकांनी पाठ फिरवली असली, तरी ५७ टक्के लोकांनी चिनी वस्तू घेतली असणार, हे यातून लक्षात येते आणि ही संख्या अधिक आहे ! लोकांमध्ये अजूनही देशप्रेम जागृत करण्याची आवश्यकता आहे, हेच यातून लक्षात येते !

नवी देहली – लडाख येथील सीमेवरील गलवान खोर्‍यात गेल्या वर्षी भारतीय सैन्याचा चिनी सैन्याशी झालेल्या संघर्षानंतर संपूर्ण देशात चीनच्या विरोधात रोष निर्माण झाला होता. चीनला धडा शिकवण्यासाठी सरकारी स्तरावरून आणि नागरिकांकडून चिनी आस्थापने अन् वस्तू यांच्यावर बहिष्कार घालण्यास चालू झाले होते. केंद्र सरकारकडून चिनी अ‍ॅप्स बंद करण्यात आले, तर अनेक चिनी आस्थापनांना मिळालेली कंत्राटे रहित करण्यात आली होती. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या आवाहनामुळे गेल्या वर्षभरात ४३ टक्के भारतियांनी चिनी वस्तू घेण्याकडे पाठ फिरवली, असे एका अहवालातून समोर आले आहे. ‘लोकलक्रिल्स’ने याविषयी सर्वेक्षण केले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ‘लोकलक्रिल्स’नेही असेच सर्वेक्षण केले होते. त्यानुसार ७१ टक्के लोकांनी त्यावेळी चीनमध्ये बनवण्यात आलेले कोणतेही साहित्य विकत घेतले नव्हते.