उल्हासनगर महापालिकेने ५०५ इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याच्या नोटिसा बजावल्या !

ठाणे, १४ जून (वार्ता.) – उल्हासनगर येथे वर्ष १९९२ ते १९९८ या कालावधीत रेतीच्या अभावामुळे उलवा रेती आणि दगडाचा बारीक चुरा यांपासून बहुतांश इमारती बांधण्यात आल्या. अशा इमारतींचे सज्जे कोसळून अनेक जणांचे बळी गेले. मे मासामध्ये मोहिनी पॅलेस आणि साईशक्ती या दोन इमारतींचे सज्जे कोसळून १२ जणांचा जीव गेला. महानगरपालिकेने वर्ष १९९२ ते १९९८ या कालावधीत बांधण्यात आलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करून ५०५ इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यापूर्वी १० वर्षे जुन्या इमारतींना नोटीस देणे महानगरपालिकेने चालू केले आहे.

दुर्घटनाग्रस्त झालेल्या वरील २ इमारतींच्या बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा नोंदवण्याची मागणीही अनेकांकडून होत होती. त्यानुसार साहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी आयुक्तांच्या आदेशानुसार इमारतीचे बांधकाम व्यावसायिक मनोज लाहोरी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. (महापालिका प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? गुन्हा नोंदवण्याची मागणी केल्यावर गुन्हा नोंदवला जाणे, ही निष्क्रीयताच होय ! – संपादक)