भावी भीषण आपत्काळासाठी, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त सनातनची नूतन आयुर्वेदाची औषधे

आगामी काळात भीषण नैसर्गिक आपत्ती ओढवतील, तसेच तिसर्‍या महायुद्धात कोट्यवधी लोक अणूसंहारामुळे मृत्यू पावतील, असे संतांचे भाकीत आहे. अशा आपत्काळात दळणवळणाची साधने, आधुनिक वैद्य किंवा वैद्य कुठे उपलब्ध होतील, याची शाश्‍वती वाटत नाही. तसेच तयार औषधांचाही तुटवडा भासू शकतो. सध्याच्या कोरोनाच्या काळात हे अनुभवण्यास येत आहे. ‘औषधालयात जावे, तर प्रचंड गर्दी असणे, औषधालयांत औषधे उपलब्ध नसणे, ऑनलाईन औषधे मागवली, तरी ‘दळणवळण बंदी’मुळे ती वेळेत न पोचणे, औषधांचा तुटवडा असल्याने त्यांचा काळाबाजार होणे’ असे अनेक वाईट अनुभव अनेकांनी घेतले आहेत. भयावह आपत्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. 

वैद्य मेघराज पराडकर

भावी भीषण आपत्काळाला तोंड देण्यासाठी आपण आतापासूनच सिद्धता करणे आवश्यक आहे. आपत्काळासाठीच्या सिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने सनातन नेहमीच्या विकारांमध्ये लागणार्‍या २० आयुर्वेदीय औषधांची निर्मिती करत आहे. सनातनची ही औषधे शास्त्रोक्त आणि प्रभावी आयुर्वेदाची औषधे बनवण्यासाठी महाराष्ट्रातील वैद्यांमध्ये प्रसिद्ध असलेले सनातनचे पू. वैद्य विनय भावे (वरसईकर वैद्य भावे) यांच्या मार्गदर्शनाखाली बनवली जात आहेत. ही औषधे काही मासांत उपलब्ध होतील. या औषधांविषयीची माहिती आपण क्रमशः पहाणार आहोत.

सनातनची आयुर्वेदाची औषधे (प्रातिनिधिक छायाचित्र)

१. सनातन शुण्ठी (सुंठ) चूर्ण

१ अ. गुणधर्म आणि संभाव्य उपयोग : ‘सुंठ चूर्ण उष्ण गुणधर्माचे असून कफ आणि वात नाशक आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.

१ आ. सूचना

१. वयोगट ३ ते ७ यासाठी पाव प्रमाणात आणि ८ ते १४ यासाठी अर्ध्या प्रमाणात औषधाचे चूर्ण घ्यावे.

२. मधुमेह असल्यास औषध मध किंवा साखर यांसह न घेता पाण्यासह घ्यावे किंवा नुसतेच चघळून खावे.

३. उष्णतेची लक्षणे (उष्ण पदार्थ न सोसणे, तोंड येणे, अंगाची आग होणे, मूत्रमार्गाची जळजळ होणे, अंगावर पुरळ उठणे, चक्कर येणे इत्यादी) असतांना आणि उन्हाळा अन् पावसाळ्यानंतर येणारा शरद ऋतू (ऑक्टोबर हिट) या काळांत सुंठीचा वापर टाळावा किंवा अल्प करावा.

४. उष्णता वाढल्यास सुंठ बंद करून १ – २ दिवस दिवसातून २ वेळा १ पेला लिंबू सरबत प्यावे.

५. सुंठीचा लेप वाळत आल्यावर पाण्याने धुवावा. त्या ठिकाणची जळजळ सोसत नसल्यास पुन्हा लेप लावू नये. जळजळ थांबण्यासाठी त्या ठिकाणी लिंबाचा रस चोळावा.

६. चूर्णात पोरकिडे होऊ नयेत, यासाठी ते शीतकपाटात ठेवावे. अन्यथा एका मासात संपवावे.

 (क्रमशः उद्याच्या दैनिकात)

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०२१)