सातारा – विविध शालेय उपक्रमांमध्ये संपूर्ण राज्यात झालेल्या गुणांकनामध्ये सातारा जिल्ह्याने राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, प्रथम क्रमांक मुंबई जिल्ह्याचा असून तो शहरी भाग आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा विचार केल्यास सातारा जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळा सिद्धी, शालेय पोषण आहार, माध्यान्ह आहार, दिव्यांग विद्यार्थ्यांना सोयीसुविधा, यू-डायस, डायट, एस्.सी.ई.आर्.टी. अशा विविध उपक्रमांना राज्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्याला गुणांकन देण्यात आले, तसेच शाळेची सुरक्षितता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, डिजिटल उपक्रम आदी गोष्टींनाही गुणांकन देण्यात आले आहे. हे गुणांकन ६०० गुणांचे होते. सातारा जिल्ह्याला ६०० पैकी ४२७.८१ गुणांकन प्राप्त झाले आहे.