पणजी – गोव्यात ८ जून या दिवशी कोरोनाबाधित १४ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ३ सहस्र ११४ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ४७३ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण १५.१८ टक्के आहे. दिवसभरात ९५७ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित ८६ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या घटून ५ सहस्र ८९९ झाली आहे.
खासगी रुग्णालयांनी मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांची संख्याच शासनाला कळवली नाही !
खासगी रुग्णालयांमध्ये ऑगस्ट २०२० ते २५ मे २०२१ या कालावधीत ६७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही माहिती खासगी रुग्णालयांनी शासनाला कळवलीच नाही. ही माहिती खासगी रुग्णालयांनी ७ जून २०२१ या दिवशी शासनाला दिल्यावर एकूण मृत रुग्णांच्या संख्येत ६७ मृत रुग्ण अंतर्भूत करण्यात आले. (९ मास माहिती न देणार्या अशा दायित्वशून्य खासगी रुग्णालयांना शासनाने समज द्यायला हवी ! – संपादक) अशाच प्रकारे २६ मे २०२१ ते ५ जून २०२१ या कालावधीत खासगी रुग्णालयांत झालेल्या ५ रुग्णांच्या मृत्यूची संख्या ८ जूनला घोषित करण्यात आलेल्या एकूण मृत रुग्णांच्या संख्येत अंतर्भूत करण्यात आली आहे.