सावंतवाडी – कोरोना महामारी रोखण्यासाठी ‘मिथिलिन ब्ल्यू’ औषध रामबाण उपाय म्हणून ठरणार असल्याने ते सिद्ध करण्यासाठी शासनाने त्वरित अनुमती द्यावी. कोरोनावरील उपचारांत त्याचा समावेश करावा, अशी मागणी नगरसेवक अधिवक्ता परिमल नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
प्रसिद्धीपत्रकात नाईक म्हणाले की, ‘‘कोरोना महामारीच्या गंभीर परिस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असतांना वापरण्यात येत असलेल्या औषधांची गुणवत्ता, तुटवडा आणि अवाजवी किंमत यांमुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, तसेच वैद्यकीय क्षेत्रातही एक संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ‘मिथिलिन ब्ल्यू’ औषधाचा वापर यापूर्वीही देश-विदेशात दुर्धर आजारांवरील प्रभावी औषध म्हणून करण्यात आला आहे. अत्यल्प दरात, तसेच सहजरित्या उपलब्ध होणारे हे औषध हे अँटी व्हायरल (संसर्गरोधक), अँटी बॅक्टेरिअल (जिवाणूरोधक) आणि अँटी फँगल (बुरशीरोधक) आहे. हे औषध कोरोना विषाणू येण्याच्या पूर्वीपासूनच प्रभावी कार्य करत असल्यामुळे ‘अर्सेनिक अल्बम’ किंवा तत्सम स्वरूपाच्या औषधांच्या धर्तीवर त्याला लवकरात लवकर मान्यता द्यावी, अशी मागणी नगरसेवक अधिवक्ता परिमल नाईक यांनी केली आहे.