पिंगुळी गावात १२ जूनपर्यंत कडक दळणवळण बंदी

कुडाळ – ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढत होत असल्याने प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत कार्यक्षेत्र कोरोनामुक्त करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. त्याप्रमाणे कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गाव कोरोनामुक्त करण्यासाठी गावात ७ ते १२ जून या कालावधीत कडक दळणवळण बंदी  करण्याचा निर्णय पिंगुळी ग्रामपंचायतीने घेतला आहे, तसेच या कालावधीत विनाकारण फिरणार्‍यांची ‘रॅपिड टेस्ट’ करण्यात येईल, अशी माहिती सरपंच निर्मला पालकर यांनी दिली आहे.

१२ जून या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत गावातील सर्व दुकाने पूर्णतः बंद रहातील. ६ दिवस कडक दळणवळण बंदी करूनही परिस्थिती सुधारली नाही, दळणवळण बंदी वाढवली जाईल. या कालावधीत व्यवसाय करतांना आढळल्यास, तसेच दुकाने आणि घरगुती दुकाने छुप्या पद्धतीने चालू असल्याचे आढळल्यास संबंधितांना १५ सहस्र रुपये दंड आकारण्यासह त्यांच्यावर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात येईल, असे सरपंच पालकर यांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालयात मिळालेले उपचार आणि समुपदेशन यांमुळे कोरोनामुक्त झालो ! – कोरोनामुक्त रुग्ण

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – मोठ्या प्रमाणावर आलेला ताप, अशक्तपणा, कुटुंबाच्या आधुनिक वैद्यांनी न्युमोनियाचे केलेले निदान अशा परिस्थितीत जिल्हा रुग्णालयामध्ये आलो होतो. तेथील आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांनी तत्परता दाखवत अतीदक्षता विभागात (आयसीयूमध्ये) भरती करून वेळेवर उपचार केले. समुपदेशनातून सकारात्मक ऊर्जा मिळून कोरोनावर सहज मात करून घरी परतलो. जिल्हा रुग्णालयाने मला दिलेल्या जीवदानाविषयी त्यांना शतशः प्रणाम, अशी भावना वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील ३० वर्षीय कोरोनामुक्त रुग्णाने व्यक्त केली.

कुंभारमाठ येथे १४ कातकरी कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

मालवण – तालुक्यातील कुंभारमाठ येथील माळावर रहाणार्‍या आदिवासी कातकरी समाजातील १४ कुटुंबांना ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ स्वयंसेवी संस्था आणि मुंबई येथील ‘ऊर्जा मूव्हमेंट’ यांच्या वतीने ३५ सहस्र रुपये किमतीच्या जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. तौक्ते वादळामुळे हानी झालेल्या कातकरी बांधवांनी या साहाय्याविषयी आनंद व्यक्त केला, असे ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी दिली.

सावंतवाडीत कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ‘काँग्रेस थाळी’

सावंतवाडी – राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त ५ जूनपासून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ‘काँग्रेस थाळी’ चालू करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर आणि शहर काँग्रेस अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत ३० सहस्र २३१ कोरोनाचे रुग्ण

१. कोरोनाचे नवीन ६४१ रुग्ण

२. ६ जूनला मृत्यू झालेले रुग्ण ९

३. मृत्यू झालेले एकूण रुग्ण ७५७

४. बरे झालेले रुग्ण २३ सहस्र २४८

५. उपचार चालू असलेले रुग्ण ६ सहस्र २२०