कोरोनापासून मुलांचे रक्षण करण्यासाठी आजपासून व्याख्यानमाला

‘आयुर्वेद व्यासपिठा’वरून होणार प्रसिद्ध वैद्यांचे ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन

पणजी, ६ जून (वार्ता.) – कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे तज्ञांचे मत आहे. ‘कोरोनापासून मुलांचे रक्षण कसे करावे ?’, हा प्रश्‍न सध्या पालकांना पडला आहे. या प्रश्‍नाला आयुर्वेदाच्या आधारे उत्तर देण्यासाठी आयुर्वेद व्यासपिठाने ‘ऑनलाईन’ व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. सोमवार, ७ जून ते १३ जूनपर्यंत एक दिवस आड दुपारी ४ ते सायंकाळी ५.३० या वेळेत या व्याख्यानमालेत प्रसिद्ध वैद्य मार्गदर्शन करणार आहेत. ही व्याख्यानमाला मराठी भाषेत असेल.

रुग्णालयात भरती होणे, खाटांची उपलब्धता, कोरोनाची लस घेणे हे नंतरचे उपाय आहेत. या आजाराची झळ मुलांपर्यंत पोचू नये, यासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार होणे आवश्यक असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. ७ जून या दिवशी अहमदनगर येथील वैद्य मैत्रेयी लिमये या ‘आयुर्वेदातील बालरोग’, ९ जून या दिवशी ठाणे येथील वैद्य सुचित्रा कुलकर्णी या ‘मुलांचा स्वास्थ्यरक्षक आहार’, ११ जून या दिवशी नागपूर येथील वैद्य प्रसाद देशपांडे ‘मुलांसाठी सोपे आणि उपयुक्त व्यायाम/योग’ आणि १३ जून या दिवशी वैद्य लक्ष्मीकांत कोर्टीकर ‘मुलांच्या आरोग्यासाठी उपाय’ या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

व्याख्यानमाला www.youtube.com/c/AyurvedVyaspeeth Kendriya/live या लिंकवर उपलब्ध असेल.

गोव्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण १३.३३ टक्के

 

पणजी – गोव्यात ६ जून या दिवशी कोरोनाबाधित १६ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ३ सहस्र २२ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ४०३ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण १३.३३ टक्के आहे.