कौटुंबिक जीवनात पतीला समर्थपणे साथ देणार्‍या आणि साधना करण्याच्या दृढ निश्‍चयाने मुलांना स्वावलंबी बनवून त्यांच्यावर साधनेचे संस्कार करणार्‍या बीड येथील सौ. प्रज्ञा विवेक झरकर !

वैशाख कृष्ण पक्ष द्वादशी (७.६.२०२१) या दिवशी सोलापूर येथे पूर्णवेळ सेवा करणार्‍या सौ. प्रज्ञा विवेक झरकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारी त्यांची मुलगी कु. स्नेहा आणि मुलगा श्री. वेदांत अन् रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारी मुलगी कु. निकिता झरकर यांनी वर्णन केलेली त्यांच्या त्यागाविषयीची आणि कुटुंबियांसह स्वतःच्या साधनेसाठी करत असलेल्या कठोर प्रयत्नांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.                         

(भाग १)

श्री. विवेक आणि सौ. प्रज्ञा झरकर

सौ. प्रज्ञा विवेक झरकर यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

कु. स्नेहा झरकर
कु. निकिता झरकर
श्री. वेदांत झरकर

१. विवाहानंतर उद्भवलेल्या अनेक प्रसंगांत स्थिर राहून यजमानांना दिलेली साथ !

१ अ. आईला घरातील सर्वांचे जेवण झाल्यावर शेष राहिलेले अन्नपदार्थ खावे लागणे : आमच्या आईने लग्नानंतर बारावीची परीक्षा दिली. तिला लहानपणी खाण्या-पिण्याच्या आवडी-निवडी होत्या. तिने या सवयी सहजतेने पालटल्या.

आमची आजी (बाबांची आई) आईला चांगली वागणूक देत नसे. ती तिला नवीन कपडे घेऊ देत नसे. ‘सर्वांचे जेवण झाल्यावर शेष राहिलेले अन्नपदार्थ आईने खायचे’, असे असायचे.

१ आ. सासरच्या व्यक्तींच्या (सासू, दीर आणि नणंद यांच्या) स्वभावामुळे आईला सतत मानसिक त्रास व्हायचा. बाबा या गोष्टींमध्ये लक्ष घालायचे नाहीत. ती हे सहजतेने सहन करायची.

१ इ. सासरच्या लोकांनी आई-बाबांना २ वेळा घरातून बाहेर काढणे आणि काही कालावधीनंतर घरी बोलावणे, तरीही या प्रसंगांविषयी आईच्या मनात कटूता नसणे : काही क्षुल्लक कारणावरून आमचे आजी, आजोबा आणि काका यांनी आई-बाबांना नेसत्या वस्त्रानिशी घरातून २ वेळा बाहेर काढले होते. त्या वेळी बाबांना नोकरी नव्हती. आई-बाबा आईच्या आई-वडिलांकडे (नांदेड येथे) गेले होते. तेव्हा आजी-आजोबांनीही त्यांना घरात घेतले नाही. ते म्हणाले, ‘‘तुम्ही विवाह केला आहे. तुमचा संसार आहे. तुम्ही तुमची अडचण सक्षमपणे सोडवा.’’ त्याच स्थितीत आई-बाबा पुन्हा बीड येथे परतले होते.

त्या वेळी स्वयंपाकासाठी भांडी, रहायला खोली, असे त्यांच्याकडे काहीही नव्हते. नंतर बाबांनी नोकरी करायला आरंभ केला. त्यानंतर काही कालावधीनंतर आजी-आजोबांनी त्यांना परत घरी बोलावले. त्या वेळी आईने तिचे आई-वडील किंवा आमचे आजी-आजोबा, माझे बाबा यांच्याकडून अपेक्षा केली नाही. ती आजही या प्रसंगाविषयी बोलतांना म्हणते, ‘‘ते आमच्याशी कठोर वागले; पण त्यातून आम्हाला शिकता आले.’’ यातून तिची सकारात्मक राहून परिस्थितीला श्रद्धेने सामोरे जाण्याची वृत्ती दिसून येते.

१ ई. आईने घरातील कामे करून किराणा दुकान चालवणे : आमचे स्वतःचे किराणा दुकान होते. माझ्या बाबांना पूर्वी कष्ट करायची सवय नव्हती. आमचे काका शिकत असल्याने ते घरात साहाय्य करायचे नाहीत. त्या वेळी कु. स्नेहा १ वर्षाची होती. आई तिला सांभाळून आमचे आजी-आजोबा, बाबा, काका आणि आत्या या सर्वांचे करून किराणा दुकान चालवायची.

१ उ. दुसर्‍या मुलीच्या जन्माच्या वेळी घरातील व्यक्तींनी साहाय्य न करणे, त्या वेळी आईलाच रुग्णालयात स्वतःचे आणि बाळाचे करावे लागणे : आईला पहिली मुलगी झाल्यावर घरातील सर्वांना दुसरा मुलगा हवा होता; पण आईला दुसरी मुलगी (निकिता) झाली. तेव्हा आईला रुग्णालयात कुणी पहायलाही गेले नाही. आईलाच स्वतःचे सर्व करून बाळाचे करावे लागत होते. तिला तेथे कुणी डबाही देत नव्हते. ती रुग्णालयात जे मिळेल, ते खाऊन स्वतःच घरी आली. आजही आम्ही तिला ‘घरचे तुझ्याशी असे कसे वागले ? निदान बाबांनी तरी पहायला हवे होते’, असे म्हटल्यावर आई म्हणते, ‘‘माझे प्रारब्ध होते. देवाने ते फेडले.’’

१ ऊ. आजी-आजोबांच्या शेवटच्या आजारपणात आई-बाबांनी त्यांची मनापासून सेवा करणे : काही कालावधीनंतर आजी आणि आजोबा दोघेही पुष्कळ आजारी होते. प्रथम आजोबांचे निधन झाले. त्यानंतर आजी अंथरुणाला खिळून होती. आजीच्या मल-मूत्रविसर्जनापासून सर्व गोष्टी आईलाच कराव्या लागायच्या. बाबांना त्यांचे काम सांभाळून आणि आईला आमचे करून आजीची सेवा करतांना त्या दोघांचीही ओढाताण व्हायची; पण ते पुष्कळ मनोभावे आजीची सेवा करायचे.

१ ए. कुटुंबावर ऋण असणे, यजमानांना नोकरी नसणे आणि ती परिस्थिती स्वीकारणे : आजीच्या निधनानंतर घराचे दायित्व बाबांवर आले. काकांचे लग्न झालेले नव्हते. त्या वेळी आमच्यावर पुष्कळ ऋण (कर्ज) होते. त्या वेळी बाबांना नोकरी नव्हती, तरीही आईने ती परिस्थिती श्रद्धेने स्वीकारली.

१ ऐ. आई-बाबांनी एकमेकांना साथ देणे : बाबांना नोकरी लागल्यावर त्यांना मिळणार्‍या अल्प वेतनात घरखर्च भागत नसे. त्यानंतर काही वर्षांनी घरात लहानसे किराणा दुकान चालू केल्यावर तेही आईच सांभाळायची. बाबांचे शिक्षण अल्प असल्याची उणीव आईने कधीच भासू दिली नाही. आई-बाबांनी प्रत्येक प्रसंगात एकमेकांना साथ दिली.

१ ओ. काही कालावधी पूर्णवेळ साधना केल्यानंतर घरी राहून नोकरी करण्याचा यजमानांचा निर्णय सहजतेने स्वीकारणे : मागील ३ – ४ वर्षांपूर्वी बाबा पूर्णवेळ साधना करत होते. नंतर त्यांनी घरी राहून नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्या प्रसंगातही आई स्थिर होती. तिने सहजतेने त्यांचा हा निर्णय स्वीकारला. त्या वेळी त्यांची निवासाची व्यवस्थाही नव्हती. आईने त्यांची योग्य ती व्यवस्था करण्यात साहाय्य केले.

२. मुलांना घडवणारी आदर्श माता

अ. आईला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तोंडपाठ होता. ती पुस्तकातील काहीही न वाचता स्नेहाला शिकवायची. त्यामुळे स्नेहामध्ये इतिहासाची आवड निर्माण झाली. निकितालाही आईने पुष्कळ कसोशीने शिकवले आहे.

आ. आई आम्हाला महाभारत, रामायण यांतील, तसेच अन्य महापुरुषांच्या विविध कथा सांगायची. ‘त्या गोष्टींमधून काय शिकायचे ?’, हेही ती आम्हाला सांगायची.

इ. ‘शालेय अभ्यासक्रमातील पुस्तकांतील धड्यांतील सूत्रे प्रतिदिन आचरणात कशी आणायची ?’, हे ती आम्हाला वारंवार सांगायची.

ई. ती आमच्याकडून सायंकाळी विविध स्तोत्रे आणि विष्णुसहस्रनाम म्हणून घ्यायची.

उ. आम्ही (स्नेहा आणि निकिता) लहानपणी पुष्कळ भांडायचो. आईने आम्हाला आमच्या प्रत्येक चुकीसाठी शिक्षा दिली.

३. नियोजनकौशल्य

आईमध्ये आधीपासूनच ‘नियोजनकौशल्य’ हा गुण आहे. आम्ही शाळेत असतांना ‘आम्ही कोणत्या वेळेत काय करायचे ?’, याचे ती नियोजन करून द्यायची. ती बाबांचे वेतन आणि घरातील किराणा साहित्य यांचे अचूक नियोजन करायची.

(क्रमशः वाचा उद्याच्या अंकात)

– कु. निकिता झरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा आणि कु. स्नेहा अन् श्री. वेदांत झरकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.५.२०२१)