पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी कुटुंबाविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज

१. मोठ्या भावाचे दायित्व

१ अ. मोठा भाऊ निःस्वार्थी असल्याने तो गरीब रहाणे आणि बाकीचे भाऊ लग्न झाल्यावर पत्नीसह वेगळे रहात असल्याने ते स्वार्थी असणे : जगात मोठा भाऊ गरीब का असतो ? सर्व भावांचे विवाह करवून देत राहिल्याने तो कर्जबाजारी होतो. बाकी भाऊ बायका घेऊन वेगळे राहू लागतात; कारण ते स्वार्थी असतात. मोठा भाऊ कर्जाचा मालक होतो; कारण तो निःस्वार्थी असतो.’

१ आ. कुटुंबातील मोठ्या भावांना सूचना

१ आ १. प्रपंचात लहान भावडांना शिक्षण होईपर्यंत, म्हणजे अर्थार्जनासाठी सक्षम होईपर्यंतच सांभाळावे, त्यांना आपापले लग्न करण्यास सांगावे, म्हणजे त्यांना संसार करतांना कराव्या लागणार्‍या कष्टांची जाणीव होईल ! : ‘लहान भावांना केवळ शिक्षण द्या आणि सोडून द्या. त्यांना स्वतःला बायको, स्वतःच आणू द्या. मग कर्ज आणि भाऊ यांची किंमत कळेल ! ‘मोठ्या भावाने लग्ने करून दिली पाहिजेत’, असे शास्त्रात कुठेच लिहिलेले नाही. मोठा भाऊ ६ जणांची लग्ने करत रहातो. तेव्हा हे लहान भाऊ त्याला झालेले कर्ज बघत नाहीत. हा मोठा भाऊ कर्ज फेडत रहातो आणि गरीब होतो. हे चोर, स्वार्थी लहान भाऊ बायका घेऊन वेगळे होतात. मग मोठ्या भावाची बायका-पोरे त्याला सारखे दोष देतात; म्हणून शिक्षण होईपर्यंत लहान भावांची काळजी घ्यावी आणि मग त्याला त्याच्या प्रारब्धावर सोडून द्यावे. बायको त्याला स्वतःलाच करू द्या. त्यालाच कर्ज फेडू द्या, म्हणजे मस्ती जिरेल.’

२. कुटुंबातील स्त्रीचे आचरण कसे असावे ?

२ अ. घरातील स्त्रीने सकाळी लवकर उठून अंघोळ करावी, याने घरात आणि संसारात योग्य निर्णय घेता येऊन यश लाभते अन् घरात लक्ष्मी नांदते ! : ‘जी बाई सकाळी लवकर उठून अंघोळ करत नाही, ती घाणेरडी असून तिच्या घरात गचाळगंगा आलेली आहे’, असे समजावे. ज्या घरात सकाळी अंघोळ करत नाहीत किंवा सकाळी देवपूजा होत नाही, तिथे सदाची भीक रहाते. अंघोळ आणि ध्यान यांमुळे बुद्धी धुवून निघते. बुद्धी चांगली चालते. घर आणि संसार यांच्या संदर्भात योग्य निर्णय घेते. संसारात काय किंवा परमार्थात काय चुका करणे म्हणजे हानी करून घेणे होय. मग घरात यश किंवा लक्ष्मी न रहाता सदा अवदसा नांदते. मी सांगायचे काम केले. ऐकायचे कि नाही, हे तुम्हीच ठरवावे. निवळी गावामध्ये मॅट्रिकमध्ये शिकणारी एक मुलगी सकाळी अंघोळ करत नाही, असे मला दिसले; म्हणून हे सांगत आहे.’

३. संसाराचा ताप

‘वडिलांना या संसारात पडून किती ताप झाला, याचा अनुभव असूनसुद्धा आपल्या वयात आलेल्या मुलाचे लग्न करून ते त्याला त्या तापामध्ये ढकलतात. लग्नात म्हातारे वडील मुलास आशीर्वाद देतात, ‘मी संसार करून मेलो. आता तूपण मर. ही आणलेली बाईल (बायको) घे आणि तिच्यासाठी हाडाची काडे कर अन् माझ्या सारखाच संसारात गुंतून मर.’

४. आई-वडिलांची काळजी न घेणारी आताची पिढी

‘पूर्वीच्या काळी मुलाने आई-वडिलांना काशीला तीर्थयात्रेला घेऊन जायचे, अशी प्रथा होती. आताची मुले आई-वडिलांना दुःखी करत आहे. मग तेच दुःख पुन्हा उलटते. मुलगा वडील होतो, तेव्हा त्याने आई-वडिलांना दिलेल्या दुःखाचा वाटा त्याच्या वाट्याला येतो. श्रावण बाळ, पुंडलिक यांची कथा स्मरावी.’

– पूज्य (ह.भ.प.) सखाराम रामजी बांद्रे (वय ७० वर्षे), कातळवाडी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (पू. सखाराम बांद्रे महाराज यांचे हे लिखाण २००५ ते २०२० या कालावधीतील आहे.)