सरकारी अधिकार्याशीही उद्धट वर्तन !
संभाजीनगर – येथील एम्.आय.एम्. पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील दुकानांवरील कारवाई मागे घेण्यासाठी कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्याशी उद्धट वर्तन करून अरेरावी केली, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसमोर महिला पोलिसाशी गैरवर्तन केले. (स्वतःसमोर स्वतःच्याच सहकारी महिला पोलिसाशी होणारे गैरवर्तनही रोखू न शकणारे पोलीस कधी जनतेचे रक्षण करू शकतील का ? – संपादक) या प्रकरणी पोळ यांनी स्वत: क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. त्यावरून खासदार जलील यांच्यासह नासेर सिद्दिकी, शेख सलीम शेख शरीफ, राजेश मेहता यांच्यासह २१ जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करण्यासह विविध कलमांंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
१. शहरातील बंद केलेल्या ६६ दुकानांविषयी कामगार उपआयुक्त कार्यालयात सुनावणी होती. खासदार इम्तियाज जलील हे २४ दुकानदारांना घेऊन पोळ यांच्या दालनात गेले.
२. खासदार जलील यांनी पोळ यांचा एकेरी उल्लेख करत ‘व्यापार्यांना दुकान उघडण्याची अनुमती दे, त्यांना काय दंड करणार ते आताच सांग’, असे सांगितले. त्यावर पोळ जलील यांना प्रक्रिया समजावून सांगत असतांना ‘‘तू दुकानातील कामगारांना खाण्या-पिण्यासाठी पैसे पुरवणार आहेस का ? तू जिल्हाधिकार्यांची हुजरी करतोस, जिल्हाधिकारी तुझा भगवान आहे का ? मुख्यमंत्र्यांनी या कामगारांना साहाय्य केले का ?’’, असे नाहक प्रश्न विचारत उद्धटपणे वर्तन केले. (सरकारी अधिकार्यांशी असे वागणारे लोकप्रतिनिधी जनतेशी कसे वागत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक)
#औरंगाबाद – खासदार इम्तियाज जलील यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातावर मारला फटका pic.twitter.com/M2T439yTtj
— News18Lokmat (@News18lokmat) June 2, 2021
३. क्रांती चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे, महिला अंमलदार एन्.टी. खान यांच्यासह इतर कर्मचारी कार्यालयात आले.
४. खासदार इम्तियाज हे उद्धटपणे बोलत असतांना महिला पोलीस अंमलदार खान यांनी कर्तव्याचा भाग म्हणून भ्रमणभाष काढून ध्वनीचित्रीकरण चालू केले. तेव्हा खासदार जलील यांनी त्यांच्या हाताला झटका देत त्यांचा भ्रमणभाष खाली पाडला. (अशा पद्धतीने महिला पोलिसाचा भ्रमणभाष खाली पाडणे, ही गुंडगिरी नव्हे का ? – संपादक)
५. यासह जलील यांनी महिला पालीस अंमलदाराला ‘मॅडम, तुम्ही येथे ‘एन्टरटेनमेंटसाठी’ आलात का ? जमत नसेल, तर बाहेर उभे रहा,’ अशा अपमानास्पद शब्दांत सुनावले. त्यानंतर व्यापार्यांनीही मोठमोठ्याने बोलून गोंधळ घातला. (एखाद्या महिला पोलीस कर्मचार्याशी कसे वागावे, याचे जराही भान नसणारे लोकप्रतिनिधी ! – संपादक)