कोल्हापूर – दळवळण बंदी असल्याने रोजंदारीवर काम करणार्यांसह अनेक बेघरांसमोर दोन वेळ भोजनाचा प्रश्न निर्माण झाला. अशांच्या साहाय्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ‘मिशन संवेदना’ नावाचा उपक्रम चालू केला. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी अशा लोकांना थेट घरपोच धान्य दिले, तर काहींना भोजन दिले. प्रतिदिन २ सहस्रांपेक्षा अधिक लोकांना असे साहाय्य करून कोल्हापूर पोलिसांनी इतरांसाठी आदर्श उभा केला.
पोलिसांकडून एकटे रहाणार्या ज्येष्ठ नागरिकांना थेट दूरभाष करून काय साहाय्य हवे ? याची विचारणा केली जात आहे. त्यांना औषधे, किराणा साहित्य किंवा अधिकोषातील पैसेही तेवढेच दायित्व घेऊन पोलिसांनी आणून दिले. या संदर्भात पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, ‘‘नागरिकांची अडचण येऊ नये, कुणीही उपाशी राहू नये, ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये यांसाठी कोल्हापूर पोलीस दलाने ‘मिशन संवेदना’ हा उपक्रम चालू केला आहे. याला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.’’