उतारवयातही आश्रमजीवनाशी जुळवून घेणारे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अरविंद कुलकर्णी (वय ८० वर्षे) आणि ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सरस्वती कुलकर्णी (वय ७२ वर्षे) !

श्री. अरविंद कुलकर्णी यांचा वैशाख कृष्ण पक्ष तृतीया/चतुर्थी (२९.५.२०२१) या दिवशी तिथीप्रमाणे वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांची मुले कु. रूपाली आणि श्री. राहुल कुलकर्णी यांनी वडिलांविषयी आणि आईविषयी लिहून दिलेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्री. अरविंद कुलकर्णी

श्री. अरविंद कुलकर्णी यांना सनातन परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त नमस्कार !

डावीकडून बसलेले श्री. अरविंद कुलकर्णी, सौ. सरस्वती कुलकर्णी आणि उभे असलेले श्री. राहुल (मुलगा), कु. रूपाली (धाकटी मुलगी)

१. समाधानी 

‘माझे आई-बाबा (सौ. सरस्वती कुलकर्णी आणि श्री. अरविंद कुलकर्णी) दोघेही समाधानी आहेत. त्यांनी परिस्थिती स्वीकारली आहे आणि त्यात ते आनंदी आहेत. त्यांना घरात ‘शीतकपाट, दूरदर्शन संच किंवा अन्य अत्याधुनिक सोयी हव्यात’, असे कधीही वाटले नाही. ‘देवाने आपल्याला आपल्या दैनंदिन आवश्यकता भागवण्याएवढे पैसे दिले आहेत. त्याचा सुयोग्य वापर करूया’, असाच त्यांनी विचार केला. ते आम्हालाही (मी, राहुल आणि माझी मोठी बहीण सोनाली यांनाही) सांगतात, ‘‘देवाने आपल्याला दिले आहे, त्यात समाधानी रहायचे. ’’

२. आई अकस्मात् रुग्णाईत होणे आणि विश्रांती घेण्यासाठी काही दिवसांसाठी रामनाथी आश्रमात रहायला येणे

२ अ. परात्पर गुरुदेवांनी आईला रामनाथी येथील आश्रमात रहायला येण्याविषयी सांगितल्यावर आईने ‘आयुष्याच्या शेवटी रामनाथी आश्रमात रहायला येईन’, असे सांगणे : आई पूर्वी देवद आणि नंतर रामनाथी या आश्रमांत काही मास राहिली होती; पण पूर्णवेळ साधना करण्यासाठी म्हणून आश्रमात रहायला येण्याची तिची सिद्धता नव्हती. ती मला भेटायला रामनाथी आश्रमात यायची. त्या वेळी परात्पर गुरुदेव साधकांकडे आईसाठी निरोप पाठवायचे ‘‘तुम्ही आश्रमात रहायला या.’’ तेव्हा आई प्रत्येक वेळी त्यांना सांगायची, ‘‘मला जोपर्यंत जमते, तोपर्यंत घरी राहीन. मला तुमच्याविना कोण आहे ? माझ्या आयुष्याच्या शेवटी मी रामनाथी आश्रमात येईन.’’

२ आ. आई अकस्मात् रुग्णाईत होणे आणि त्या वेळी साधक-मुलगीही रुग्णाईत असल्याने घरातील कामे करणे अशक्य होणे, त्यामुळे आई काही दिवसांसाठी आश्रमात रहायला येणे : तिला आश्रमात आणण्यासाठीच जणू देवानेच लीला घडवली. २ वर्षांपूर्वी आई अकस्मात् रुग्णाइत झाली. तिला रुग्णालयात भरती करावे लागले. ती रुग्णालयातून घरी आल्यावरही तिला काहीच काम करता येत नव्हते. तिला बोलता येत नव्हते आणि काही आठवतही नव्हते. त्या वेळी मी रुग्णाईत असल्याने घरातील सर्व कामे करणे मला जमत नव्हते. नंतर माझे आजारपण वाढले. मला ताप आणि खोकला असल्याने मला घरातील काम करणे जमेनासे झाले. माझी ही स्थिती बघून तिने थोडे दिवस आश्रमात रहायला येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आई-बाबा आश्रमात रहायला आले.

​काही मास आश्रमात राहिल्यानंतर तिची शारीरिक स्थिती सुधारली; पण पूर्ववत् झाली नाही. तिचे काही ना काही दुखणे सतत चालू होते. या वेळी आश्रमात आल्यावर तिचे आणि बाबांचे मन रमले.

२ इ. आश्रमात आल्यावर साधकांनी आई-वडिलांना ‘तुम्हाला जमेल, तेवढी सेवा करा’, असे सांगितल्याने त्यांच्या मनावरील सेवा न जमण्याचा ताण दूर होणे : आश्रमात रहायला येण्यापूर्वी त्या दोघांच्या मनात ‘आश्रमात अमुक घंटे सेवा करायला जमणार नाही. आश्रमात काही सेवा न करता नुसते कसे रहायचे ? आमच्याकडून एखादी चूक झाली, तर काय होईल ?’, असे विचार असायचे. मी त्यांना अनेक वेळा समजावूनही त्यांच्या मनातील अशा प्रकारचे विचार जात नव्हते. ते आश्रमात आल्यावर त्यांना सेवेविषयी कुणी काही सांगितले नाही. साधक आई-बाबांना ‘तुम्हाला जमेल, तेवढी सेवा करा’, असे सांगायचे. बाबा त्यांना जमेल, तशी सेवा करतात; पण आईला शारीरिक त्रासामुळे सेवा करायला जमत नाही. तिच्या मनात ‘मला सेवा करता येत नाही’, असा विचार असतो.

३. आश्रमजीवनाशी सहजतेने जुळवून घेणे

अ. ते आश्रमात आल्यावर ‘हा पदार्थ मला आवडत नाही. दुसरे काहीतरी हवे’, असे म्हणाले नाहीत किंवा घरी करत असलेल्या एखाद्या पदार्थाची आठवण येऊन ‘तो पदार्थ बाहेरून विकत आणूया’, असेही म्हणाले नाहीत.

आ. आम्ही चौघेही (मी, राहुल (भाऊ), आई-बाबा) वेगवेगळ्या खोल्यांत रहातो. आई-बाबांचे याविषयी काही गार्‍हाणे नाही. ते समाधानी आहेत. ते म्हणतात, ‘‘एकत्र राहिले की, एकमेकांकडून अपेक्षा वाढतात. वाद होतो. त्यापेक्षा सर्वांसमवेत राहूया.’’

इ. ‘मी आणि राहुलने त्यांना वेळ द्यावा, त्यांच्याशी बोलावे, त्यांच्या समवेत जेवायला बसावे किंवा त्यांना वैयक्तिक आवरायला साहाय्य करावे’, अशी त्यांची अपेक्षा नसते. आई-बाबा या वयातही स्वतःचे कपडे धुतात. त्यांना बरे वाटत नसल्यास ते चिकित्सालयात जाऊन औषध घेतात.’
– कु. रूपाली कुलकर्णी (धाकटी मुलगी), (२१.११.२०२०)

४. घर विकून आश्रमात रहाण्याचा निर्णय घेणे

‘आई-बाबा आश्रमात आल्यावर आम्ही रहाते घर विकण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आई-बाबांनी त्वरित होकार दिला. आई मला म्हणाली, ‘‘घरातील वस्तू भंगारात देऊ नकोस. भंगारात विकल्या, तर त्यांना किंमत येणार नाही. त्यापेक्षा आवश्यकता असणार्‍यांना त्या वस्तू दे. साधकांना घरातील भांडी दे.’’ मी त्याप्रमाणे केले. आई मला म्हणाली, ‘‘आपण ज्यांना घर विकू, त्या लोकांना कोणताही त्रास व्हायला नको’, अशा रितीने सर्व कामे पूर्ण कर.’’ बाबांनी मला सांगितले, ‘चालू वर्षाची घरपट्टी, पाणीपट्टी, तसेच विजेचे देयक भर.’’
– श्री. राहुल कुलकर्णी (मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.११.२०२०)

‘घर विकल्यामुळे मनात त्याविषयीचे विचार न येता खर्‍या अर्थाने काशीयात्रा (आध्यात्मिक साधना-प्रवास) चालू होईल’, असे वाटणे !

‘आपत्काळात बर्‍याच साधकांना आपली घरे विकून दुसरीकडे रहायला जावे लागणार आहे. अशा वेळी त्यांचा दृष्टीकोन कसा असावा, हे  कु. रूपाली कुलकर्णी यांच्या लेखावरून लक्षात येईल. या लेखाविषयी कु. रूपाली कुलकर्णी यांचे अभिनंदन !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘माझे आई-बाबा (सौ. सरस्वती कुलकर्णी आणि श्री. अरविंद कुलकर्णी) रामनाथी आश्रमात रहायला आल्यावर राहुलने (भावाने) आई-बाबांच्या संमतीने आमचे गावाकडील घर विकले. त्या वेळी कोरोनाची साथ चालू असल्याने आई-बाबांना घरी जाता आले नाही. राहुलने आईच्या इच्छेनुसार घरातील वस्तू बहिणीला आणि साधकांना दिल्या. आई-बाबांनी अतिशय कष्टाने बांधलेले घर त्यांच्या वृद्धावस्थेत विकले आणि त्यांनी घेतलेल्या सर्व वस्तू इतरांना दिल्या. या प्रसंगाच्या वेळी मला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातील कथा आठवली.

‘गोंदवलेकर महाराज यांच्या वृद्ध आईला काशीला जायचे असते. तेव्हा त्यांची आई महाराजांना म्हणते, ‘‘तू मला काशीला घेऊन चल; पण मी गेल्यावर हे घर नीट सांभाळ.’’ आईला काशीला घेऊन निघत असतांना महाराज त्यांच्या घरावर तुळशीपत्र ठेवतात, म्हणजे लोकांना सांगतात, ‘‘या घरातून तुम्हाला हवे असेल, ते सर्व घेऊन जा.’’ महाराजांनी असे सांगितल्यावर लोक लगेचच महाराजांच्या घरातील सर्व वस्तू घेऊन जातात आणि त्यांच्या आईसमोरच सर्व घर रिकामे होते. त्या वेळी महाराज आईला म्हणतात, ‘‘काशीला जातांना तुझ्या मनात घराविषयी विचार यायला नको. आता तू आनंदाने काशीयात्रा करू शकतेस.’’

आमचे काहीसे या गोष्टीसारखेच झाले. आम्ही सर्व जण रामनाथीला (काशीला) आलो असलो, तरी आमच्या मनात घराविषयी विचार यायचे. आता घर विकल्यामुळे आमच्या मनात घराचे विचार येणार नाहीत आणि खर्‍या अर्थाने आमची काशीयात्रा (आध्यात्मिक साधना-प्रवास) चालू होईल.

​‘परात्पर गुरुदेव, कलियुगातील संधीकाळात आपणच आम्हाला मायेच्या जाळ्यातून मुक्त करत आहात. आपणच आमच्याकडून साधना करवून घेऊन आपल्या चरणांशी घ्या’, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.११.२०२०)