कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेकांच्या मनात भय, नकारात्मता, निराशा वाढली आहे, तसेच काहींच्या मानसिक संतुलनावरही विपरीत परिणाम झाला आहे. अशा स्थितीत नियमित साधना केल्याने मानसिक तणाव, भीती न्यून होऊन मन चिंतामुक्त होते आणि आनंदी राहू शकते. प्रार्थनेमध्ये अनन्यसाधारण बळ असल्याने ईश्वराला प्रार्थना करणे महत्त्वाचे आहे. प्रार्थना केल्याने मन स्थिर आणि सकारात्मक होण्यास साहाय्य होते. भक्ताने ईश्वराला प्रार्थना केल्यावर ईश्वर भक्तांना साहाय्य करतोच; मात्र ही प्रार्थना मनापासून करायला हवी. प्रार्थनेमुळे रोगाचे निवारण होते, हे विविध प्रयोगांमधून स्पष्ट झाले असून त्याविषयीचा संशोधनात्मक अहवालही प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे विविध प्रार्थनांच्या माध्यमातून आपण मन स्थिर आणि सकारात्मक ठेवू शकतो.
प्रार्थनेसमवेत हवा शुद्ध करण्यासाठी अग्निहोत्र परिणामकारक आहे. प्रतिदिन सूर्योदय आणि सूर्यास्त झाल्यानंतर लगेचच अग्निहोत्राचा विधी करावा. कोणत्याही अणू उत्सर्जनाचा प्रभाव नष्ट करण्यासाठी अग्निहोत्र ही उपयुक्त पद्धती असल्याने या वेळी अग्निहोत्र करायला सांगितले आहे. अग्निहोत्रामुळे ९० टक्के जंतूंची वाढ रोखली जाते. हवेतील सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण न्यून होते. यामुळे वातावरण शुद्ध होऊन हवेत निर्माण होणार्या जंतूंची निर्मिती रोखू शकत असल्याने आपण स्वतःचे रक्षण करू शकतो. हिंदूंनी सध्याच्या आपत्काळात अशा विविध उपायांचा अवलंब करून नियमित साधना करायला हवी.