सनातन-निर्मित ‘कलियुगातील द्रष्टे ऋषि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन’ या ग्रंथाचे पू. (श्रीमती) प्रमिला वैशंपायन यांच्या शुभ हस्ते प्रकाशन !

कौटुंबिक कार्यक्रमात पार पडला प्रकाशन सोहळा !

सनातन निर्मित ग्रंथाचे मुखपृष्ठ

कल्याण, २६ मे (वार्ता.) – सनातन-निर्मित ‘कलियुगातील द्रष्टे ऋषि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन (गुणवैशिष्ट्ये, कार्य, सिद्धी आणि देहत्याग)’ या ग्रंथांचा प्रकाशन सोहळा २६ मे या दिवशी, म्हणजेच वैशाख पौर्णिमेला असलेल्या योगतज्ञ प.पू. दादाजी यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या कल्याण येथील ‘अदृश्य छाया’ या निवासस्थानी भावपूर्ण वातावरणात पार पडला. प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पत्नी पू. प्रमिला वैशंपायन यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी प.पू. दादाजी यांचे ज्येष्ठ पुत्र श्री. सुरेश वैशंपायन, ज्येष्ठ स्नुषा सौ. सुनंदा वैशंपायन, धाकटे पुत्र पू. शरदाकाका वैशंपायन, धाकट्या स्नुषा सौ. ललिता वैशंपायन आणि प.पू. दादाजींची मनोभावे सेवा केलेले सनातनचे साधक श्री. अतुल पवार उपस्थित होते.

प्रारंभी पू. प्रमिला वैशंपायन यांनी प.पू. दादाजी यांच्या छायाचित्राला पुष्प अर्पण केले. यानंतर ‘ॐ आनंद हिमालयं’ हा मंत्र, दत्तमाला, तसेच ‘रुद्राष्टक कवच’ म्हणून प्रकाशन सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. या वेळी श्री. अतुल पवार यांनी सदर ग्रंथामध्ये सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेले मनोगत वाचून दाखवले. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्री. अतुल पवार हे या ग्रंथाचे संकलक आहेत.

प.पू. दादाजी यांच्या काही भक्तांनी ‘ऑनलाईन’ माध्यमाद्वारे हा सोहळा पाहून आनंद व्यक्त केला. प.पू. दादाजी यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून प्रकाशन सोहळ्याची सांगता करण्यात आली.

योगतज्ञ प.पू. दादाजी यांच्याविषयीचा हा ग्रंथ पाहून आनंद वाटला ! – पू. प्रमिला वैशंपायन

ग्रंथांचे प्रकाशन करतांना पू. (श्रीमती) प्रमिला वैशंपायन

ग्रंथ प्रकाशन करतांना पू. प्रमिला वैशंपायन यांची भावजागृती होत होती. ग्रंथांचे कौतुक करतांना त्या म्हणाल्या, ‘‘योगतज्ञ प.पू. दादाजी यांच्याविषयीचा हा ग्रंथ पाहून आनंद वाटला. तुम्ही पुष्कळ चांगले काम केले आहे.’’

वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे

१. ग्रंथ प्रकाशनाच्या वेळी श्री. अतुल पवार यांना योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या अस्तित्वाची अनुभूती येत होती.

२. प्रकाशनाच्या आधी श्री. अतुल पवार पू. प्रमिला वैशंपायन यांना म्हणाले, ‘‘या ग्रंथामध्ये तुमचे आणि प.पू. दादाजी यांचे एकत्रित छायाचित्र आहे. प्रकाशन झाल्यावर मी ते तुम्हाला दाखवतो.’’ प्रकाशनानंतर पू. प्रमिला वैशंपायन यांनी तो ग्रंथ उघडून पाहिला. वैशिष्ट्यपूर्ण घटना म्हणजे त्यांच्याकडून या वेळी तेच पृष्ठ उघडले गेले, ज्यावर योगतज्ञ प.पू. दादाजी आणि पू. प्रमिला वैशंपायन यांचे एकत्रित छायाचित्र होते. छायाचित्रावर लिहिले होते की, तपस्वी आणि आदर्श दांपत्य !’’

योगतज्ञ प.पू. दादाजी : कलियुगातील थोर ऋषि !

एकमेवाद्वितीय योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘प्राचीन काळी ऋषिमुनींनी केलेले खडतर तप, त्यांचे द्रष्टेपण, सर्वज्ञता, लीलासामर्थ्य, वैराग्यशीलता इत्यादींविषयी आपल्याला ऐकून ठाऊक असते. कलियुगात असे कोणी असू शकेल, याची कल्पना आपण करू शकत नाही. मात्र कलियुगात होऊन गेलेले असे एकमेवाद्वितीय व्यक्तीमत्त्व म्हणजे, योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !

योगतज्ञ दादाजींनी अत्यंत कष्टप्रद साधना केल्यामुळे त्यांना अनेक सिद्धी प्राप्त होत्या. मोठमोठे योगीजन सिद्धींच्या मोहात अडकतात; पण योगतज्ञ दादाजींनी या सिद्धींचा दुरुपयोग कधीच केला नाही. ‘लक्ष्मीसिद्धी’मुळे त्यांच्या हातात पैसा सहजपणे खुळखुळू शकत असतांनाही ते आयुष्यभर अत्यंत साधेपणाने राहिले. ‘भविष्यकथनसिद्धी’मुळे त्यांनी अनेक भाकिते आधीच केली आणि ती नंतर तंतोतंत खरी ठरली. यामुळे ते प्रसिद्धीच्या उच्च आसनावर विराजमान असतांनाही नेहमीच संन्यस्ताप्रमाणे जीवन जगले. ‘दीन-दुःखीजनांच्या अडचणी सोडवून त्यांना अध्यात्माच्या मार्गावर आणता यावे’, यासाठीच त्यांनी सिद्धींचा उपयोग केला ! किंबहुना ‘निःस्वार्थी भावाने जनकल्याणासाठी समर्पित जीवन !’, अशीच त्यांच्या जीवनाची व्याख्या करता येते. त्यांच्या तपस्वी व्यक्तीमत्त्वाचे आणि लोकोत्तर कार्याचे अनेक पैलू प्रस्तुत ग्रंथात उलगडून दाखवले आहेत.

सनातनवर सतत कृपाछत्र धरणारे योगतज्ञ दादाजी !

माझ्या गुरूंच्या देहत्यागानंतर काही काळाने माझी योगतज्ञ दादाजींशी भेट झाली आणि नंतर त्यांच्याशी जे ऋणानुबंध जुळले, ते सदाचेच ! या योगे देवाने मला गुरूंची उणीव भासू दिली नाही.

गेली १५ वर्षे माझे महामृत्यूयोग टळावेत, सनातनच्या साधकांवर होणारी वाईट शक्तींची आक्रमणे दूर व्हावीत, सनातनचे सर्व संकटांपासून रक्षण व्हावे आणि ईश्‍वरी राज्याच्या (हिंदु राष्ट्राच्या) स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यांसाठी योगतज्ञ दादाजींनी अखेरच्या श्‍वासापर्यंत अनुष्ठाने, जप-तप इत्यादी केले.

वर्ष २०१३ मध्ये योगतज्ञ दादाजींनी मला सांगितले, ‘‘आता मला दैवी शक्तींनी माझी इहलोकीची यात्रा समाप्त करण्याची आज्ञा केली आहे. त्यामुळे आता मला देहत्याग करावा लागेल.’’ त्यावर मी योगतज्ञ दादाजींना म्हटले, ‘‘तुमच्यानंतर आमचे रक्षण कोण करणार ? आम्ही कोणाला उपाय विचारायचे ?’’ त्यावर त्यांनी थोडा विचार करून सांगितले, ‘‘सध्या तसा पृथ्वीवर दुसरा कोणी नाही. दैवी शक्तींना सांगून मीच माझे आयुष्य तुमच्यासाठी वाढवून घेतो.’’ या एका प्रसंगावरूनही योगतज्ञ दादाजींची सनातनवर असलेली अपरंपार प्रीती आणि त्यांचा अध्यात्मातील असामान्य अधिकार लक्षात येतो.

योगतज्ञ दादाजी यांच्यासारख्या उच्च कोटीच्या संतांचे कार्य निर्गुणातूनही चालूच असते. त्यामुळे ‘आज योगतज्ञ दादाजी स्थुलातून जरी नसले, तरी निर्गुणातून ते आमच्या पाठीशी आहेतच’, अशी आमची दृढ श्रद्धा आहे.

कृतज्ञता आणि प्रार्थना !

थोडक्यात योगतज्ञ दादाजींमुळेच मी आणि ‘सनातन संस्था’ अजून जिवंत अन् कार्यरत आहोत. त्यांचे हे ऋण काय आम्हाला फेडता येईल ? केवळ अशक्य ! यामुळे अंतःकरणात त्यांच्याविषयी हेच शब्द उमटतात, ‘कृतज्ञता…कृतज्ञता…कृतज्ञता !’ मी योगतज्ञ दादाजींच्या चरणी इतकीच प्रार्थना करू शकतो, ‘आपल्या कृपेचे छत्र आमच्यावर सदोदित राहू दे.’

‘प्रस्तुत ग्रंथाच्या माध्यमातून योगतज्ञ दादाजींच्या अलौकिक कीर्तीचा सुगंध सर्वदूर दरवळावा आणि सर्वांच्याच अंतःकरणात त्यांच्याविषयी दृढ श्रद्धा अन् भक्ती निर्माण व्हावी’, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थनाही करतो.

योगतज्ञ दादाजींच्या चरणी ग्रंथ अर्पण !

प्रस्तुत ग्रंथ हा योगतज्ञ दादाजींच्या कृपेमुळे आणि त्यांच्या अव्यक्त संकल्पानेच प्रकाशित होत आहे. यासाठी हा ग्रंथ त्यांच्या चरणी अर्पण !’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांच्या ऑनलाईन खरेदीसाठी
SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५३१७

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक