व्यष्टी साधना आणि सेवा गांभीर्याने करणार्‍या अन् प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव असणार्‍या  हडपसर, पुणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) वृंदा विलास कुलकर्णी !

कै. (श्रीमती) वृंदा कुलकर्णी

‘१०.५.२०२१ या दिवशी हडपसर, पुणे येथील साधिका श्रीमती वृंदा विलास कुलकर्णी यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६७ वर्षे होते. ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा महेश पाठक यांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. व्यष्टी साधनेत सातत्य असणे आणि ‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी होणे

‘श्रीमती वृंदा कुलकर्णी यांचे नामजप, तसेच व्यष्टी साधनेचे अन्य प्रयत्न यांत सातत्य होते. त्या दळणवळण बंदीच्या कालावधीत चालू झालेल्या ‘ऑनलाईन’ सत्संगाला उपस्थित असायच्या. त्यात त्या पुढाकार घेऊन सहभागी व्हायच्या.

सौ. मनीषा पाठक

२. स्वतःच्या स्वभावदोषांविषयी प्रांजळपणाने सांगणे आणि साधनेचे प्रयत्न तळमळीने करणे

या वर्षभरात काकूंच्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रयत्नांत वाढ झाली होती. त्या स्वतःतील स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांचे चिंतन करून त्यांची व्याप्ती काढून पाठवायच्या. त्या साधनेचे प्रयत्न तळमळीने करायच्या. त्या स्वतःच्या स्वभावदोषांविषयी प्रांजळपणाने सांगायच्या. त्या मला म्हणायच्या, ‘‘ताई, मला कळत आहे की, मी काही गोष्टींत अडकले आहे. मला त्यातून बाहेर पडायचे आहे.’’ ‘त्यातून बाहेर कसे पडायचे ?’, याविषयी त्या मला विचारायच्या. हे सांगतांना त्यांच्या मनात खंत असायची. त्या साधनेतील मनाच्या स्तरावरील अडथळ्यांचा नेमकेपणाने अभ्यास करायच्या. काकूंचे वय झाले होते आणि त्यांना शारीरिक मर्यादाही होत्या, तरी वर्षभरात त्यांनी व्यष्टी साधना किंवा सेवा यांत सवलत घेतली नाही. त्यांनी कधीही वेळ वाया घालवला नाही.

३. स्वतःच्या घरी साधिकेच्या निवासाची व्यवस्था करणे

सोलापूर येथून एक साधिका नोकरीसाठी पुण्यात येणार होती. त्या वेळी काकूंनी स्वतःच्या घरी तिच्या निवासाची सिद्धता दर्शवली. त्यामुळे ताईचे काकूंकडे ३ मास रहाण्याचे नियोजन होऊ शकले.

४. कोरोना झाल्यावर घरी अलगीकरणात असतांना प्रतिदिन ५ – ६ घंटे नामजप करणे आणि त्यांच्या बोलण्यात उत्साह अन् आनंद जाणवणे

काकूंना कोरोना झाल्यावर त्या घरी अलगीकरणात होत्या. तेव्हा त्यांना प्रतिदिन ५ – ६ घंटे नामजप करायला सांगितला होता. तेव्हाही त्यांच्या बोलण्यात आनंद, उत्साह आणि कृतज्ञता जाणवायची. त्या म्हणायच्या, ‘‘प.पू. गुरुदेव माझ्याकडून ५ – ६ घंटे नामजप करवून घेतात. मला काहीच अडचण नाही. माझ्यासाठी साधकांनी नामजप करायला नको.’’

५. ‘त्यांची साधनेत प्रगती होत आहे’, असे मला जाणवले.’

– सौ. मनीषा महेश पाठक, पुणे (१८.५.२०२१)