केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीच्या विरोधात व्हॉट्सअ‍ॅपची देहली उच्च न्यायालयात याचिका

नवी देहली – केंद्र सरकारने सामाजिक माध्यमे आणि संकेतस्थळे यांच्या संदर्भात बनवलेल्या नव्या नियमावलीच्या विरोधात व्हॉट्सअ‍ॅप या सामाजिक माध्यमाने देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. ‘केंद्र सरकारच्या दिशानिर्देशांमुळे नागरिकांच्या खासगी गोष्टी खासगीत रहाणार नाहीत’, असा दावा व्हॉट्सअ‍ॅपने यात केला आहे. या नियमानुसार सामाजिक माध्यमे असणार्‍या आस्थापनांना त्यांच्या मंचावरून पाठवलेल्या संदेशांचा स्रोत स्वतःकडे नोंदून ठेवावा लागणार आहे. केंद्र सरकारने सामाजिक माध्यमांसाठी ३ मासांत नवी नियमावली लागू करण्यास सांगितली होती. त्याचा कालावधी २५ मे या दिवशी संपला. व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर आणि इंस्टाग्राम यांनी अद्याप हे नियम लागू केले नसल्याने सरकार त्यांच्यावर कारवाई करण्याच्या प्रयत्नात आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या नवीन नियमामुळे एखाद्या वापरकर्त्याला संदेश कुठून आले हे शोधणे, त्यांच्या वैयक्तिक अधिकारांचे उल्लंघन ठरेल. आमच्यासाठी हे लोकांनी पाठवलेल्या सर्व संदेशांवर लक्ष ठेवण्यासारखे होईल. आम्ही प्रत्येक मेसेज ‘एंड-टू-एंड एन्क्रिप्ट’ (सुरक्षित) ठेवतो. त्याला काहीच अर्थ रहाणार नाही.