गलवानमध्ये भारत आणि चीन सैन्यात संघर्ष झालेला नाही ! – भारतीय सैन्य

भारतीय सैन्याकडून ‘द हिंदु’चा खोटारडेपणा उघड !

  • अशा प्रकारची खोटी वृत्ते देऊन जनतेच्या मनात भीती निर्माण करणे आणि भारतीय सैन्याला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी अशा दैनिकांवर कारवाई झाली पाहिजे, असे कुणाला वाटल्यास आश्‍चर्य वाटू नये !
  • भारतात राष्ट्रघातकी प्रसारमाध्यमांची कमतरता नाही. त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने ‘आमचे कुणीही काहीच बिघडवू शकत नाही’, अशी उद्दाम वृत्ती त्यांच्यात निर्माण झाली आहे. शांतताकाळात ही स्थिती असेल, तर युद्धकाळात अशी राष्ट्रघातकी प्रसारमाध्यमे कशा प्रकारचे वृत्तांकन करतील, याचा विचारही न केलेला बरा !

नवी देहली – भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये गलवान खोर्‍यात पुन्हा एकदा संघर्ष झाल्याचा दावा करणार्‍या ‘द हिंदु’ या इंग्रजी दैनिकाच्या वृत्ताचे भारतीय सैन्याने खंडन केले आहे. यासंदर्भात भारतीय सैन्याने एक निवेदन जारी केले असून यासंदर्भातील परिस्थिती स्पष्ट केली आहे.

भारतीय सैन्याने सांगितले की, २३ मे या दिवशी ‘द हिंदु’मध्ये ‘गलवान खोर्‍यामध्ये चिनी सैन्यासमवेत झडप’, असे ठळक वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याविषयी आम्ही स्पष्ट करतो की, मे २०२१ च्या पहिल्या आठवड्यात पूर्व लडाखमधील गलवान खोर्‍यामध्ये भारतीय आणि चिनी सैनिक यांच्यामध्ये असा संघर्ष झाला नव्हता. पूर्व लडाखमधील समस्यांचे लवकर निराकरण व्हावे, यासाठी प्रक्रिया चालू आहे. सैन्य अधिकारी किंवा अधिकृत स्रोताकडून कोणतीही माहिती देईपर्यंत प्रसारमाध्यमांनी कोणतेही वृत्त प्रसिद्ध करू नये.